Jalgaon News : जळगावमध्ये नाकाबंदी दरम्यान साडेपाच कोटींचे सोने-चांदी जप्त

जळगाव : सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख बदोबस्त असून नाक्यानाक्यावर पोलिसांकडुन वाहनांची तपासणी सूरू आहे. अशाच एका तपासणीदरम्यान पोलिसांनी 4 किलो सोने व 34 किलो चांदी जळगावमधून जप्त केली आहे. या सोन्या चांदीची किंमत 5 कोटी 59 लाख 61 हजाराच्या घरात आहे.
यानंतर पोलिसांनी वाहन चालकाची चौकशी केली असता शहरातील तीन ज्वेलर्स मालकांचे हे सोने चांदी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हे दागिने वाहून नेणाऱ्या चालकाकडे आवश्यक कागदपत्र नसल्याने पोलिसांनी हा साठा जप्त केला आहे. त्यामुळे आता या ज्वेलर्सच्या मालकांची चौकशी केली जाणार आहे. हे सोने पोलिसांनी ट्रेझरीमध्ये जमा केले असून आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या वतीने कागद पत्रांची पडताळली केली जात आहे.
रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिस नाकाबंदी करीत असताना पुणे येथून जळगावात येणाऱ्या वाहनातून चार किलो सोने व 34 किलो चांदी आढळली होती. या सोन्या चांदीची किंमत 5 कोटी 59 लाख 61 हजार आहे. रेमंड चौफुलीवर स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली.





