न्यूयॉर्क : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या ७९ व्या सत्राच्या निमित्ताने जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ऍनालेना बेअरबोक, जपानचे परराष्ट्र मंत्री योको कामिकावा आणि ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री माउरो विएरा यांची भेट घेतली आणि संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत लवकरात लवकर सुधारणा करण्याच्या मुद्याचा आग्रह धरला. हे तिन्ही देश आणि भारताचा जी-४ गटामध्ये समावेश होतो. सोमवारी, जयशंकर यांनी बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मो. तौहीद हुसेन यांची भेट घेतली आणि बांगलादेश आणि भारत यांच्यातील परस्पर हितसंबंधांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या ७९ व्या अधिवेशनाची सर्वसाधारण चर्चा आजपासून २८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील आणि ३० सप्टेंबर रोजी या सत्राचा समारोप होईल.