जैसलमेर : राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एका खासगी बसला लागलेल्या भीषण आगीने हाहाकार माजला. जैसलमेरहून जोधपूरकडे निघालेल्या या बसला थईयात गावाजवळ आग लागल्याची घटना घडली. या घटनेत ५७ प्रवाशांपैकी तीन लहान मुले आणि चार महिलांसह १५ जणांचा जळून मृत्यू झाला. आग इतक्या वेगाने पसरली की, काही मिनिटांतच संपूर्ण बस ज्वाळांच्या भक्षस्थानी गेली. स्थानिक ग्रामस्थ आणि लष्करी जवानांच्या तत्परतेमुळे अनेकांचे प्राण वाचले, परंतु ही दुर्घटना टाळता आली नाही. ही दुर्घटना मंगळवारी दुपारी ३:३० वाजता, जैसलमेर-जोधपूर महामार्गावरील (NH 62) थईयात गावाजवळ घडली. दुपारी ३ वाजता जैसलमेर बसस्थानकातून ५७ प्रवाशांसह ही खासगी बस जोधपूरकडे रवाना झाली होती. बसच्या मागील भागातून अचानक धूर येऊ लागला आणि काही क्षणांतच आग भडकली. प्रवाशांनी सांगितले की, “धुरामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. काहींनी काच फोडून उड्या मारल्या, पण अनेकजण आगीत अडकले.” आगीचा भडका इतका तीव्र होता की, बाहेर पडणे अशक्य झाले. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बसच्या खिडक्या तोडून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जवळील लष्करी तळावरील जवानांनीही अग्निनाशक उपकरणांसह मदत केली, ज्यामुळे आग पसरण्यापासून रोखली गेली. या घटनेची माहिती मिळताच तीन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना प्रथम जैसलमेरच्या जवाहर रुग्णालयात नेण्यात आले, जिथे प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना जोधपूरच्या एमबी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून, काहींची प्रकृती गंभीर आहे.