Jairam Ramesh : सर्वोच्च न्यायालयाला कमजोर बनवण्याचा प्रयत्न; जयराम रमेश यांची भाजपवर टीका

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज स्वतंत्रपणे आणि तटस्थपणे चालायला हवे. मात्र, त्या न्यायालयाला कमजोर बनवण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत, असे टीकास्त्र कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोडले. सर्वोच्च न्यायालयाने विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांसाठी कालमर्यादा निश्चित करणारा आदेश नुकताच दिला.
त्याविषयी तीव्र नापसंती व्यक्त करणारी टिप्पणी याआधी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी केली. त्यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनीही एक भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालय कायदा करणार असेल; तर संसद आणि विधानसभा बंद करायला हव्यात, असे त्यांनी म्हटले. त्या टिप्पणींवर रमेश यांनी पत्रकारांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया दिली.
कायदे बनवताना राज्यघटनेच्या मूलभूत ढाच्याविरोधात जाऊ नका एवढेच सर्वोच्च न्यायालय सांगत आहे. मात्र, घटनात्मक पदे भुषवणारे, मंत्री आणि भाजपचे खासदार त्या न्यायालयाविरोधात बोलत आहेत. राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयाला अधिकार दिले आहेत. त्या अधिकारांनाच कमजोर करण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणूक रोखे, वक्फ कायदा आदींविषयी न्यायालय बोलल्याने तसे केले जात आहे, असा शाब्दिक टोला त्यांनी लगावला.





