पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, आयबी सतर्क; राजस्थानातून दोघांना उचलले

नवी दिल्ली – इंटरनेट मीडिया इंस्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकावल्याप्रकरणी आयबीच्या तीन सदस्यीय पथकाने राजस्थानच्या डीग जिल्ह्यात छापा टाकून दोन तरुणांना अटक केली आहे. अटकेनंतर दोन्ही तरुणांना पहाडी पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली.
राहुल मेओ आणि शाकीर मेओ अशी या तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण सायबर फसवणूकही करतात. पीएम मोदींना इन्स्टाग्रामवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे, त्यानंतर तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.
अशा प्रकारे आयबीने पकडले –
ज्या व्यक्तीच्या फोनवरून पंतप्रधानांना धमकी देण्यात आली होती, त्याने राजस्थानच्या डहाना गावात फोनद्वारे दुसऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला होता. ही माहिती मिळताच आयबीच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून या दोन तरुणांना अटक केली. छाप्यादरम्यान पहाडी पोलिस ठाण्याचे पोलिस पथकही आयबीसोबत होते.





