पुणे | तुरुंग अधिकाऱ्याला १२ कैद्यांची बेदम मारहाण

पुणे – येरवडा मध्यवर्ती कारागृहात तुरुंग अधिकाऱ्याला दोन कैद्यांनी इतर दहा बंद्यासह बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी घडला. येरवडा कारागृहारातील सर्कल क्रमांक एक येथे ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. मागील काही दिवसांत कारागृहात होणाऱ्या आत्महत्यांमुळे कारागृह चर्चेत आहे. या घटनेत तुरुंग अधिकाऱ्याचा हात फ्रॅक्चर झाला असून डोळ्याखाली गंभीर जखम झाली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार तुरुंगाधिकारी शेरखान पठाण यांना किरकोळ कारणावरून विकी बाळासाहेब कांबळे व प्रकाश विठ्ठल रेणुसे (दोघे हि रा. धनकवडी पुणे) व इतर दहा कैद्यांनी बेदम मारहाण केली. तुरुंगाधिकारी पठाण हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सर्कल क्रमांक एक येथे उपस्थित असताना कांबळे व रेणुसे तेथे आले. त्यांनी वाद घालण्यास सुरवात केली. त्यांच्या सोबत इतरही कैदी जमा झाले. त्या दोघांनी पठाण यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या दोघांसोबत आठ ते दहा इतर कैद्यांनी देखील मारहाण केली.
कार्यालयातील एक लाखडी खुर्ची देखील पठाण यांच्यांवर मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी हजर असलेले कारागृहातील कर्मचारी व इतर बंदी यांनी खुर्ची अडवण्याचा प्रयत्न केला.
यामुळे ते बालंबाल बचावले. तुरुंग विभागाचे इतर अधिकारी व जवान यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून कैद्यांना तातडीने कारागृहातील दुसऱ्या विभागात हलविले. विकी कांबळे हा सहकार नगर पोलीस स्टेशन कडील गुन्हेगार असून मारहाणीच्या गुन्ह्यात २५ जानेवारी २०१४ पासून कारागृहात आहे. त्याच्यावर अगोदर पॉस्कोचाही गुन्हा दाखल होता.
प्रकाश रेणुसे हा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील खून व अग्निशास्त्र बाळगल्या प्रकरणी दाखल गुन्हयातील कैदी आहे. तो १७ फेब्रुवारी २०१८ असून न्यायालयाच्या आदेशाने येरवडा कारागृहात दाखल आहे.




