पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा देत राजकीय वादाला तोंड फोडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ नाऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले आणि विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया देत पळवाट काढली. शिंदे नेमकं काय म्हणाले माहीत नाही,” असे सांगत त्यांनी या वादातून अंग काढून घेतले. अजित पवारांचे सावध वक्तव्य पुण्यातील कार्यक्रमात शिंदे यांनी ‘जय गुजरात’चा नारा दिल्याने मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “मी तिथे नव्हतो, त्यामुळे शिंदे नेमकं काय म्हणाले, याची माहिती मला नाही. मी असेपर्यंत तरी असं काही घडलं नव्हतं.” पुढे त्यांनी देशातील भाषिक वैविध्याचा उल्लेख करत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला “आपला देश अनेक जाती, धर्म आणि भाषांनी समृद्ध आहे. प्रत्येक राज्याची मातृभाषा आहे, आणि आपली मातृभाषा मराठी आहे,” असे पवार म्हणाले. मात्र, शिंदे यांच्या वक्तव्यावर थेट टीका करण्याचे त्यांनी टाळले. शिंदेंच्या नाऱ्याने राजकीय खळबळ कोंढवा येथील कार्यक्रमात शिंदे यांनी आपल्या भाषणात अमित शाह यांचे कौतुक केले आणि शेवटी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ म्हणताना अचानक ‘जय गुजरात’चा नारा दिला. या घोषणेने उपस्थितांमध्ये आश्चर्याची लाट पसरली. मराठी अस्मितेचा मुद्दा संवेदनशील असताना, शिंदे यांच्या या वक्तव्याने विरोधकांना टीकेचे नवे आयुध मिळाले. शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. दुसरीकडे, शिंदे गटाकडून यावर प्रत्युत्तर दिले जात असले तरी शिंदे किंवा त्यांच्या समर्थकांनी अद्याप अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.