Jagjit Singh Dallewal : संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी सोडले आमरण उपोषण

संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) चे नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी १३१ दिवसांनंतर आपले आमरण उपोषण सोडले आहे. रविवारी फतेहगढ साहिब येथील सरहिंद धान्य बाजारात झालेल्या किसान महापंचायतमध्ये त्यांनी ही घोषणा केली. एक दिवस आधी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी डल्लेवाल यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते आणि ४ मे रोजी चंदीगडमध्ये शेतकऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले होते.
महापंचायतमध्ये डल्लेवाल म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांना वाचवण्यासाठी आप सरकारने आंदोलन संपवले. शेतकऱ्यांच्या मागणीवरून उपोषण संपवण्यात आले. बराच काळ शेतकरी त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन करत होते.” किमान आधारभूत किंमत (एमएसपी) आणि इतर मागण्यांसाठी डल्लेवाल यांनी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी उपोषण सुरू केले.
19 मार्च रोजी पंजाब पोलिसांनी जगजित सिंग डल्लेवाल, सर्वन सिंग पंढेर आणि इतर शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन खनौरी आणि शंभू सीमा रिकामी केली होती. पोलिसांनी डल्लेवाल यांना पटियाला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. ३ एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.





