Jacob Duffy Debut : आरसीबीला मिळाला नवा ‘हुकूमी एक्का’! जेकब डफीचा पदार्पणातच थरार; अभिषेक-हेडला एकाच ओव्हरमध्ये धाडलं माघारी
Jacob Duffy Debut : एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात आरसीबीच्या एका नव्या शिलेदाराने आपल्या धारदार गोलंदाजीने सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) फलंदाजीचे कंबरडे मोडले.

Jacob Duffy RCB Debut IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. दुखापतग्रस्त जोश हेझलवूडच्या जागी संघात स्थान मिळालेल्या न्यूझीलंडच्या जेकब डफी (Jacob Duffy) याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. डफीच्या या वादळी स्पेलमुळे हैदराबादच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली.
एकाच षटकात दोन मोठे मासे गळाला!
जेकब डफीने आपल्या स्पेलच्या दुसऱ्याच षटकात हैदराबादच्या स्फोटक सलामी जोडीला तंबूचा रस्ता दाखवला. प्रथम त्याने अभिषेक शर्माला (७) बाद केले आणि त्याच षटकात धोकादायक ट्रॅव्हिस हेडलाही स्वस्तात माघारी धाडले. एवढ्यावरच न थांबता, डफीने आपल्या तिसऱ्या षटकात नितीश कुमारची महत्त्वाची विकेट घेत हैदराबादला बॅकफूटवर ढकलले. डफीने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात अवघ्या २२ धावा खर्च करून ३ महत्त्वाचे बळी टिपले.
कोण आहे हा जेकब डफी?
What. A. Start. So. Far. 🥶 pic.twitter.com/HK0oYbW6dh
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 28, 2026
३१ वर्षीय जेकब डफी हा न्यूझीलंडचा अनुभवी उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. आरसीबीने त्याला मिनी लिलावात २ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या ताफ्यात सामील केले होते. डफीच्या नावावर एका कॅलेंडर वर्षात न्यूझीलंडसाठी सर्वाधिक ८१ विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. या कामगिरीसह त्याने झहीर खान आणि ब्रेट ली सारख्या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.
एप्रिल २०२५ मध्ये तो आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. त्याच्या एकूण टी-२० कारकिर्दीत १८९ बळींची नोंद आहे.डफीच्या या स्वप्नवत पदार्पणामुळे आरसीबीच्या गोलंदाजीला नवी धार मिळाली असून, आगामी सामन्यात तो प्रतिस्पर्धी संघांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार, हे स्पष्ट झाले आहे.
हैदराबादने आरसीबीसमोर ठेवले २०२ धावांचे लक्ष्य –
या सलामीच्या सामन्यात, इशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादने २० षटकांत नऊ गडी गमावून २०१ धावा केल्या. आरसीबीकडून जेकब डफी आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतले, तर भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतल्या.





