Jabbar Patel : स्वातंत्र्याच्या संघर्षावर विचार करणाऱ्यांना गांधीजींचा आदर हवा – ज्येष्ठ दिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल

प्रभात वृत्तसेवा
पुणे – अभिनेता होणे ही एक प्रक्रिया आहे. आरशासमोर बसून मेकअप करणे, संबंधित व्यक्तीरेखाचे कपडे घालणे त्यावेळी कलाकाराचे व्यक्तिमत्व घडत जाते. साहित्य, संस्कृती याची जाण असणे गरजेचे असते, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले. तसेच, देश स्वातंत्र्य करण्यास महात्मा गांधी यांनी प्रचंड कष्ट घेतले. एका अंगावरील कपड्यावर त्यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात लढा दिला ही असामान्य बाब आहे. नंतर जन्मलेल्या लोकांनी त्यांनी स्वातंत्र्य कसे मिळवले हे विचारणे योग्य नाही, असेही डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, गांधी समितीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, विनोद शिरसाठ, डॉ. शिवाजी कदम, लक्ष्मीकांत देशमुख, सचिव अन्वर राजन, डॉ. एम.एस.जाधव, स्वप्नील तोंडे उपस्थित होते.डॉ. मोहन आगाशे म्हणाले, बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये जब्बार हे नाटक करण्यामध्ये प्रसिद्ध होते. दिग्दर्शक म्हणून ते कडक भूमिका घेत असल्याने त्यांची दहशत होती.
त्याच्या सांगण्यानुसार मी काम करीत गेलो. हॉस्पिटलमध्ये काम करतानाच नाटक सरावामध्ये आम्ही गुंतलेले असत. नाटक, साहित्य, संगीत, कला या गोष्टी समाजातील विविध लोकांना एकत्रित आणतात. कुमार सप्तर्षी म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी जातीवाद संपुष्टात येऊन भाषावाद निर्माण झाला. कलाकार असला तरी त्याची वैचारिक बैठक महत्त्वाची असते. कला ही आभासी असते ती प्रत्यक्ष वस्तुस्थितीमध्ये दिसत नाही.





