Jabbar Patel : जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर !

कोल्हापूर – राजर्षी शाहूंना अभिप्रेत असणाऱ्या पुरोगामी विचारांचा प्रसार, प्रचार करण्याचे कार्य व त्यासाठी विविध व्याख्यानमालांचे आयोजन गेल्या ३८ वर्षांपासून राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या १५१ व्या जयंती दिनी समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान करणाऱ्या व्यक्तीस राजर्षी शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
यावर्षीचा राजर्षी शाहू पुरस्कार चित्रपट आणि नाट्य क्षेत्रांत दिग्दर्शक पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही घोषणा केली. यावेळी डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. चौसाळकर, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उप पोलीस अधीक्षक सुवर्णा पत्की उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांचा जन्म 23 जून 1942 रोजी पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे झाला. त्यांनी सन 1968 साली पुण्याच्या बी. जे. मेडीकल कॉलेजमधून एम. बी. बी. एस. पदवी मिळवली व स्त्रीरोगतज्ञ पत्नीबरोबर वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. त्यांचा महाविद्यालयीन जीवनापासूनच रंगभूमीशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी थिएटर अॅकेडमीची स्थापना करून विविध नाटकांचे दिग्दर्शन केले.
‘एक होता विदुषक’ सन 1991 मधील संगीतमय विनोदी चित्रपट आणि 1994 मधील ‘मुक्ता’ या राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यीक क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींवर चित्रपट व माहीतीपट बनविले आहेत. त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित चरित्रपट इंग्रजीसह नऊ भारतीय भाषांमध्ये संपूर्ण भारत व परदेशात प्रदर्शित झाला.
या चित्रपटाला सर्वोत्तम इंग्रजी चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता आणि कला दिग्दर्शन यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. डॉ. जब्बार पटेल यांचा संगीत नाटक अकादमी कडून सन 1978 साली सन्मान झाला. त्यांना भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार सन 1982 मध्ये मिळाला, पुण्यभूषण पुरस्कार 2002 मध्ये, विष्णुदास भावे पुरस्कार 2014 मध्ये मिळाला.





