J. P. Nadda : मोदी सरकारची कामगिरी सुवर्णाक्षरांत नोंदवली जाईल; जे.पी.नड्डा यांनी व्यक्त केले मत

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने ११ वर्षांच्या कार्यकाळात सकारात्मक बदल घडवले. सरकारच्या कामगिरीची नोंद सुवर्णाक्षरांत केली जाईल, असे प्रशस्तीपत्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सोमवारी दिले. त्याचवेळी त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. राहुल यांना ईश्वर सद्बुध्दी देवो, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.
मोदी सरकारच्या ११ व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून नड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी सरकारच्या आजवरच्या कामगिरीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तसेच, कॉंंग्रेससह विरोधकांवर आणि राहुल यांच्यावर टीकेची झोड उठवली. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील मागील यूपीएची राजवट घोटाळे, विभाजनवादी राजकारण, तुष्टीकरण आणि नकारात्मकतेने भरलेली होती. त्या सर्व बाबी संपुष्टात आणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोरून आव्हानांचा मुकाबला केला. त्यांनी सरकारला उत्तरदायी आणि प्रतिसादात्मक बनवले. केंद्रातील एनडीएचे सरकार मजबूत आहे. आताचा आणि पुढील ५ वर्षांचा कार्यकाळही सरकार पूर्ण करेल, असे भाकित त्यांनी केले.
मोदींनी देशाची राजकीय संस्कृती बदलून टाकली. तसेच, चांगल्या कामगिरीच्या आणि सुशासनाच्या राजकारणाचा प्रारंभ केला. मोदी सरकारने कलम ३७० हटवणे, नोटबंदी, वक्फ कायद्यात सुधारणा, नागरिकत्व दुरूस्ती कायदा, महिला आरक्षण विधेयक यांसारखे धाडसी निर्णय घेतले. देशासमोरील आव्हानांचा मुकाबला समोरून करण्याचे मोदींचे धोरण आहे. दहशतवाद, नक्षलवाद, करोना संकट यांसारख्या आव्हानांविषयी ते अधोरेखित झाले. मोदी समस्या सोडवतील असा विश्वास जनतेला वाटतो. त्यातून मोदी हैं तो मुमकिन हैं असे जनता अभिमानाने म्हणते.
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास असा मंत्र सरकारने अंगिकारला आहे. सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे लाभार्थींच्या जगण्यात सकारात्मक बदल घडले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचे सत्र सुरू आहे. भारतात २५ कोटींहून अधिक नागरिक गरिबीतून मुक्त झाल्याचे जगाने मान्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले. नड्डा यांनी राहुल यांचा उल्लेख बेजबाबदार विरोधी पक्षनेते अशा शब्दांत केला. राहुल यांचा उद्देश समजणे अवघड आहे. सर्वपक्षीय बैठकीत ते देशासमवेत उभे राहण्याची भूमिका घेतात. मात्र, बाहेर जाऊन निराधार प्रश्न विचारतात, असे ते म्हणाले.





