Manoj Bajpayee : ‘गेल्या 10 वर्षांपासून अभिनय सोडण्याचा विचार करतोय’; मनोज बाजपेयींच्या वक्तव्याने चाहत्यांना धक्का
Manoj Bajpayee : गेल्या दहा वर्षांपासून अधूनमधून अभिनय सोडण्याचा विचार मनात येत असल्याचं अभिनेत्याने म्हटले आहे.

Manoj Bajpayee : दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता मनोज बाजपेयी यने आपल्या कारकिर्दीबाबत केलेल्या एका खुलाशामुळे चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून अधूनमधून अभिनय सोडण्याचा विचार मनात येत असल्याचं अभिनेत्याने म्हटले आहे.
एका पॉडकास्टमध्ये बोलताना मनोज बाजपेयी म्हणाले, “खरं सांगायचं तर, गेल्या 10 वर्षांपासून मला वेळोवेळी अभिनय सोडावा असं वाटत आलं आहे. मात्र, प्रत्येक वेळी एखादी चांगली भूमिका समोर येते आणि मी पुन्हा काम स्वीकारतो. मला केवळ आर्थिक गरज म्हणून किंवा नाइलाजाने अभिनय करायचा नाही.”
अभिनयाबद्दलची आपली आवड कायम असल्याचेही मनोज बाजपेयीने स्पष्ट केले. “आजही एखादं वेगळं आणि मजेदार पात्र साकारण्याची इच्छा आहे. विशेषतः एखादा व्यावसायिक चित्रपट किंवा हलकाफुलका विनोदी रोल करायला आवडेल. गाण्यांवर नाचायचं, कोणतीही मोठी तयारी न करता सेटवर जाऊन आनंदाने काम करायचं, अशीही इच्छा आहे,” असे अभिनेता म्हणाला.
यावेळी अभिनेत्याने आपल्या काही गाजलेल्या चित्रपटांबद्दलही भाष्य केले. ‘अलीगढ’, ‘गली गुलियां’ आणि ‘भोसले’ यांसारख्या गंभीर भूमिकांचा मानसिक परिणाम अजूनही जाणवत असल्याचे सांगितले. “कधी कधी माझ्या मनात एक प्रकारचा अंधार जाणवतो. काही भूमिका इतक्या खोलवर मनात घर करतात की त्यांचा परिणाम मूड स्विंग्स आणि भावनिक थकव्याच्या रूपात जाणवतो.”
या परिस्थितीत अध्यात्माने आपल्याला मोठा आधार दिल्याचेही मनोजने सांगितले. तसेच वाढत्या वयाबद्दल बोलताना आपल्या आई-वडिलांसोबत अधिक वेळ घालवता आला असता तर बरं झालं असतं अशी खंतही व्यक्त केली. “मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे आणि त्याचा स्वीकार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे,” असा विचारही अभिनेत्याने मांडला.
हेही वाचा : Juhi Chawla : करिअरच्या शिखरावर असताना गुपचूप केलं लग्न; आज ‘इतक्या’ कोटींची मालकीण आहे अभिनेत्री





