कठीण आहे! पाचवी नापास आमदाराने भरले इंजेक्शनमधून सिरिंज अन्…

अहमदाबाद : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वच यंत्रणा कोलमडून गेल्या आहेत. त्यातच रुग्णांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नाहीत. दरम्यान,गुजरातमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामरेजमधील पाचवी नापास भाजप आमदाराने रुग्णासाठी चक्क इंजेक्शनमधून सिरिंज भरण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या या कृतीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
कामरेजमधील भाजप आमदार व्ही.डी.झालावाडीया यांनी एका आरोग्य केंद्रात सिरींजमध्ये इंजेक्शन भरल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र यावर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे. “आपण कुणालाही इंजेक्शन दिले नाही, केवळ रुग्णांची सेवा करीत आहोत आणि दोनशेहून जास्त रुग्ण बरे करून उत्तम स्थितीत घरी पाठविले” असा दावा त्यांनी केला.
सार्थना कम्युनिटी कोविड सेंटरमध्ये हा प्रकार घडला. झालावाडीया यांनी सांगितले की, गेली चाळीस दिवस मी हा केंद्रात स्वयंसेवी कार्य करतो आहे. मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही. मी फक्त रेमडेसिव्हीर डोस सिरींजमध्ये भरला, पण कुणालाही इंजेक्शन टोचले नाही. मी सिरींज भरत असताना जवळपास १०-१५ डॉक्टर उपस्थित होते.
दरम्यान, यावर काँग्रेसने सडकून टीका केली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आता आमदार महोदयांकडूनच प्रशिक्षण घ्यावे. तसेच या आमदाराचा पुतळा रुग्णालयात उभारण्यात यावा अशा शब्दांत टीका केली आहे.




