ITR Filing: 5 मिनिटांत पूर्ण करा ITR ई-वेरिफिकेशन! आधार, नेट बँकिंग आणि EVC द्वारे सोपी प्रक्रिया

ITR Filing 2025: इनकम टॅक्स रिटर्न (ITR) फाइल केल्यानंतर केवळ ते सबमिट करणेच पुरेसे नसते. वास्तविक, हे रिटर्न 30 दिवसांच्या आत वेरिफाय करणे अत्यावश्यक असते. अन्यथा आपले रिटर्न इनकम टॅक्स विभागाकडून अवैध ठरवले जाऊ शकते आणि सगळी मेहनत वाया जाण्याचा धोका निर्माण होतो.
ITR प्रक्रिया पूर्ण मानली जाते, जेव्हा रिटर्न ई-वेरिफाय केले जाते. यासाठी आता कागदपत्रांची गरज नाही, ना कुठल्या कार्यालयात जाण्याची गरज – फक्त काही क्लिक आणि काही सेकंदांत हे काम आटोपते!
ई-वेरिफिकेशन म्हणजे काय?
ई-वेरिफिकेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपल्या रिटर्नची ऑनलाईन पडताळणी. आधी या प्रक्रेसाठी 120 दिवसांचा कालावधी होता, मात्र 1 ऑगस्ट 2022 पासून तो फक्त 30 दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे आता हे काम वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक झाले आहे.
ई-वेरिफिकेशन करण्याचे सोपे मार्ग-
इनकम टॅक्स विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत:
आधार OTP –
आपला आधार क्रमांक पॅन कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. ई-फाइलिंग पोर्टलवर OTP ऑप्शन निवडताच आधारशी लिंक असलेल्या मोबाइलवर OTP येतो. तो 15 मिनिटांत टाकून वेरिफिकेशन करता येते.
नेट बँकिंग –
आपल्या बँकेच्या नेट बँकिंग खात्यात लॉगिन करून थेट ई-वेरिफाय करता येते. यासाठी पॅन क्रमांक बँक खात्याशी लिंक असावा.
EVC (इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड) –
हा कोड नोंदणीकृत मोबाइल व ईमेलवर येतो. कोड टाकून वेरिफिकेशन करता येते.
डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC) –
काही विशेष बाबतीत, जसे ऑडिट लागणारे रिटर्न, त्यासाठी DSC वापरावे लागते.
ई-वेरिफिकेशन कसे कराल?
–incometax.gov.in या वेबसाइटवर लॉगिन करा.
-‘ई-फाइल’ टॅबवर क्लिक करून ‘Income Tax Return’ पर्याय निवडा.
-त्यानंतर ‘e-Verify Return’ निवडा.
-आपला PAN, Assessment Year आणि Acknowledgement Number भरावा.
-OTP, नेट बँकिंग, EVC अशा पर्यायांपैकी एक निवडा.
-OTP किंवा कोड भरून ‘सबमिट’ करा.
-वेरिफिकेशन यशस्वी झाल्यानंतर स्क्रीनवर Transaction ID आणि पुष्टी संदेश दिसेल.
-ही माहिती ईमेलवरही पाठवली जाते, जी भविष्यासाठी सुरक्षित ठेवावी.
30 दिवसांचा कालावधी चुकल्यास काय?
जर तुम्ही 30 दिवसांच्या आत वेरिफिकेशन केलं नाही, तर रिटर्न अमान्य ठरेल. मात्र, अशा परिस्थितीत ‘Condonation of Delay’ साठी विनंती करता येते. ही मंजूर झाल्यानंतरच वेरिफिकेशन ग्राह्य धरले जाते.
लक्षात ठेवा!
-आपला मोबाइल नंबर आणि ईमेल ID अपडेट असावा.
-वेळेत वेरिफिकेशन करून प्रोसेसिंगमध्ये अडथळा टाळावा.
-कागदपत्रांची गरज नाही – पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन!
ITR वेरिफाय करणे आता झटपट आणि सोपे झाले आहे. त्यामुळे रिटर्न फाइल केल्यानंतर वेळ वाया न घालवता लगेच वेरिफाय करा आणि चिंता दूर करा!


