ITR Filing 2025: आयकर विवरण सादर करणे झाले आणखी सोपे; ITR-2 ऑनलाइन फॉर्म जारी

ITR Filing 2025: आयकर विभागाने अखेर ITR-2 फॉर्म ऑनलाइन सादर करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. तब्बल १०० दिवसांच्या विलंबानंतर गुरुवारी हा फॉर्म विभागाच्या e-filing पोर्टलवर अॅक्टिव्ह करण्यात आला. यापूर्वी फक्त ITR-1 आणि ITR-4 हे फॉर्म्स ऑनलाइन भरता येत होते.
आयकर विभागाने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ही माहिती दिली. “आता करदात्यांना ITR-2 फॉर्म प्री-फिल्ड डेटासह ऑनलाइन मोडमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे रिटर्न भरणे आणखी सुलभ झाले आहे,” असे विभागाने स्पष्ट केले.
एक्सेल आणि JSON चा त्रास संपला –
यापूर्वी ITR-2 फॉर्म भरताना करदात्यांना Excel युटिलिटी डाउनलोड करून, त्यात माहिती भरून ती JSON फॉरमॅटमध्ये सेव्ह करून अपलोड करावी लागत असे. मात्र आता ही सर्व प्रक्रिया दूर करत, थेट पोर्टलवर लॉग इन करून ITR-2 भरता येणार आहे.
Kind Attention Taxpayers!
Income Tax Return Form of ITR-2 is now enabled for filing through online mode with pre-filled data at the e-filing portal.
Visit: https://t.co/uv6KQUbXGv pic.twitter.com/u8EiumigEb
— Income Tax India (@IncomeTaxIndia) July 18, 2025
कोण करु शकतो ITR-2 फाइल?
-ITR-2 हा फॉर्म ज्यांची कमाई व्यवसाय किंवा प्रोफेशनमधून होत नाही, अशा व्यक्ती (Individuals) आणि हिंदू अविभाजित कुटुंबांसाठी (HUFs) आहे.
खालील प्रकारची उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी ITR-2 लागू होतो:
-पगार किंवा पेन्शनमधून मिळणारे उत्पन्न
-एक किंवा अधिक घरमालकीतून मिळणारी भाडे किंवा उत्पन्न
-शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा मालमत्ता विक्रीतून मिळालेला कॅपिटल गेन
-लॉटरी, रेस किंवा इतर कायदेशीर सट्ट्यांमधून मिळालेले उत्पन्न
-वर्षाला ₹5,000 पेक्षा अधिक शेती उत्पन्न
-RNOR (निवासी पण सामान्यत: निवासी नाही) किंवा NRI (गैरनिवासी) करदाते
फॉर्ममध्ये आधीच भरलेली माहिती –
आता Form 26AS, AIS, PAN आणि TIS या स्त्रोतांमधील माहिती स्वयंचलितरित्या ITR-2 मध्ये भरली जाईल. त्यामुळे करदात्यांना प्रत्येक बाबतीत माहिती पुन्हा भरावी लागणार नाही, आणि चुकांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होईल.
ITR फाइलिंगची अंतिम तारीख वाढवली –
यावर्षी ITR फॉर्म्समध्ये अनेक बदल झाले असल्यामुळे आणि तांत्रिक विलंब लक्षात घेता, सरकारने 2024-25 आर्थिक वर्षासाठी (2025-26 मूल्यांकन वर्षासाठी) ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै ऐवजी 15 सप्टेंबर 2025 अशी वाढवली आहे.
आवश्यक कागदपत्रांची यादी –
ITR-2 फाइल करताना करदात्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक:
– नोकरी करणाऱ्यांसाठी कंपनीकडून मिळालेला Form 16
– बँक व्याजावर TDS कापले असल्यास Form 16A (TDS सर्टिफिकेट)
– Form 26AS — आपल्या TDS आणि इतर कर आकारणीचा सारांश
– भाड्याने राहत असल्यास भाड्याच्या पावत्या
– शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमधील व्यवहार असल्यास कॅपिटल गेन स्टेटमेंट
– बँक पासबुक किंवा FD च्या पावत्या (ब्याज उत्पन्नासाठी)
– मालमत्ता भाड्याने दिल्यास भाडेकरूची माहिती, घरपट्टी आणि गृहकर्जाचा तपशील
– पूर्वीचा तोटा भरून काढण्यासाठी किंवा क्लेम करण्यासाठी संबंधित ITR-V प्रत
– कलम 80C, 80D, 80G, 80GG अंतर्गत सवलतींसाठी विमा हप्ता, देणग्या, शैक्षणिक फी, इ. चे पुरावे
अधिकृत e-filing पोर्टलवर https://www.incometax.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करून ITR-2 थेट भरता येईल.
करदात्यांनी आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवूनच रिटर्न भरावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.




