इटालियन लीग : जुवेन्ट्सची लेसेवर 4-0 ने मात

रोनाल्डोचे धडाक्यात पुनरागमन
रोम – पोर्तुगालचा स्ट्रायकर व जुवेंट्सचा अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने इटालियन लीग फुटबॉल स्पर्धेत धडाक्यात पुनरागमन केले. लेसेविरुद्धच्या शनिवारी झालेल्या सामन्यात रोनाल्डोने मिळालेल्या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करत संघाला स्पर्धेत पुन्हा एकदा वर्चस्व मिळवून दिले.
जुवेंट्सने या स्पर्धेवरील आपले वर्चस्व सिद्ध करताना 28 सामन्यांतून 22 विजय मिळवले असून गुणतालिकेत 69 गुणांसह अग्रस्थान मिळवले आहे. लेसे या क्रमवारीत 18 व्या स्थानावर असून जुवेंट्सने हा सामना एकतर्फी जिंकत आगेकूच केली.
सामना सुरु झाल्यावर पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत सुटला. दुसरा हाफ सुरू झाल्यावर पाऊलो देबलाने 53 व्या मिनिटाला गोल करत जुवेंट्सचे खाते उघडले. त्यावेळी रोनाल्डो अप्रतिम चाली रचत होता. त्याने 62 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले व संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली.
त्यानंतर गोल्जलो व्हिरियनने 83 व्या तर, मार्थस डी लीमने 85 व्या मिनिटाला गोल करत संघाला 4-0 असा विजय मिळवून दिला. हा सामना लेसेसाठी महत्त्वाचा होता. मात्र, त्यांचा पराभव झाल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
या विजयाने जुवेंट्सने स्पर्धेच्या सलग नवव्या विजेतेपदाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. करोनाचा धोका वाढल्याने ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. गेल्या आठवड्यापासून स्पर्धेला पुन्हा सुरुवात झाली. रोनाल्डोला गेल्या दोन सामन्यांत गोल करण्यात यश आले नव्हते. मात्र, लेसेविरुद्ध त्याला सुर गवसला.




