मिलान :- इंटर मिलानने आपला खेळ उंचावताना टोरिनोचा 3-1 असा पराभव केला. या विजयाच्या जोरावर इंटरने इटालियन लीग फुटबॉल स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले.
पहिल्या हाफमध्ये ऍण्ड्री बेलोटने 17 व्या मिनिटाला गोल करत टोरिनोला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, त्याचा लाभ घेण्यात अपयशी ठरल्याने त्यांना सामना गमवावा लागला. ऍश्ले यंगने 48 व्या मिनिटाला गोल करत इंटरला सामन्यात बरोबरी मिळवून दिली. यानंतर मात्र संपूर्ण सामन्यावर इंटरने वर्चस्व राखले. डीएगो गोडीनने 51 व्या मिनिटाला गोल केला व इंटरला आघाडी प्राप्त करून दिली. लेटरो मार्टिनेझने 61 व्या मिनिटाला गोल केला व इंटरला वर्चस्व मिळवून दिले.
या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये टोरिनोने ज्या पद्धतीने बचावाचे दर्शन घडवले ते सातत्य दुसरा हाफ सुरू झाल्यावर दिसले नाही. त्यांच्या गोलकिपरला इंटरच्या आक्रमणाचा अंदाजच येत नव्हता. या स्पर्धेच्या गुणतालिकेत युवेन्टस संघाने 76 गुण नोंदवताना पहिले स्थान पटकावले आहे. इंटरने या सामन्यातील विजयासह या तालिकेत दुसरे स्थान मिळवताना 68 गुणांची नोंद केली.