Weather alert : तो आजही बरसणार..! हवामान विभागाकडून अलर्ट जारी; ‘या’ जिल्ह्यांत गारपीठ आणि वादळी पावसाचा इशारा
Weather alert : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाने पुणेकरांची चांगलीच दैणा केली आहे. आजही पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Weather alert : अवकाळीने पावसाने सगळ्यांचीच चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. अशातच पुढील काही दिवस हा उन्हाळी पाऊस राज्यात मुक्कामी असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आज 3 एप्रिल या दिवशी राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात काहीशी घट नोंदवली जात असून, मुंबईतही असंच चित्र आहे. पुढच्या 3 ते 4 दिवसांनंतर हवामानाच्या या स्थितीत बदल होण्यास सुरुवात होईल.
पुण्याला झोडपले
सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसाने पुण्याला अशरक्ष: झोडपले आहे. 82 ठिकाणी झाडपडीच्या घडना घडल्या आहेत. एका ठिकाणी झाड पडून महिलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पुण्यात पावसाने 130 वर्षांचा एप्रिल महिन्यातील विक्रम मोडत या महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद केली आहे. गुरुवारी दुपारी दोन ते चार वाजता शिवाजीनगर भागातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी परिसरात 84 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
सलग दोन तास झालेल्या तुफान पावसामुळे शहरातील मध्यवर्ती भाग आणि उपनगरात अनेक रस्ते जलमय झाले होते. सायंकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सध्या वाऱ्याची ही स्थिती अरबी समुद्राच्या उत्तरेला असून, भारताच्या पश्चिम आणि उत्तर भागात शुक्रवारपासून त्याचा प्रभाव तीव्र झाल्याचे पाहायला मिळणार आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
गारपीट आणि वादळी पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अनेक भागात कांदा, गहू, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांनी सावध राहावे, विशेषतः विजेपासून आणि जोरदार वाऱ्यापासून संरक्षण घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही भागात आजही गारपिटीची शक्यता आहे. पुढील पाच दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे. सोलापूर, धाराशिव, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागात पावसाचा इशारा देण्यात आला.





