Ajit Pawar | Sunetra Pawar | Supriya Sule : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. येथे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद-भावजय अशी निवडणूक पार पडली. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना यश मिळाले तर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. अशात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘तेव्हा माझी चूक झाली’ असं म्हणत कबुली दिली आहे.
अजित पवार हे सध्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात फिरत आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले, ’लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणे, ही एक मोठी चूक होती. असं ते म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणतात, ‘राजकारण हे पार घरामध्ये शिरुन द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. त्यावेळेस केलं गेलं, पार्लामेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला.
पण एकदा बाण सुटल्यावर आपण करु शकत नाही. पण आज माझं मन मला सांगतं, तसं व्हायला नको होतं, अशी कबुली स्वतः अजित पवार यांनी दिली. सध्या सगळीकडे अजित पवारांच्या या वक्तव्याची चर्चा रंगू लागली आहे.
मात्र, अश्यातच सुप्रिया सुळेंना प्रसारमाध्यमांनी यावर प्रतिक्रिया विचारली असता त्या ‘रामकृष्ण हरी…’ इतकंच म्हणत जास्त भाष्य करणं टाळलं. “एकतर मी हे विधान ऐकलेलं किवा वाचलेलं नाही. तुमच्याकडूनच मी हे ऐकत नाही. त्यामुळे रामकृष्ण हरी”. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.