Parveen Hashmi : ‘हा टप्पा गाठायला इम्रानला 23 वर्षे लागली’; Awarapan 2 चित्रपटाचे यश पाहून पत्नी भावूक
Parveen Hashmi : या यशाने इम्रानची पत्नी परवीन हाश्मी भावूक झाली आहे. तिने सोमवारी सोशल मीडियावर ‘आवारपन २’चे पोस्टर शेअर करत पतीसाठी एक खास आणि भावनिक पोस्ट लिहिली.

Parveen Hashmi : बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी सध्या ‘आवारापन २’च्या यशाचा आनंद घेत आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारपन’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामागिरी करताना दिसत आहे. भारतात रिलीज झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात जवळपास ८२ कोटी रुपयांची भरगच्च कमाई चित्रपटाने केली आहे. या यशामुळे इम्रानने आपल्या कारकिर्दीत जवळपास १४ वर्षांनंतर मोठं यश मिळवले आहे.
या यशाने इम्रानची पत्नी परवीन हाश्मी भावूक झाली आहे. तिने सोमवारी सोशल मीडियावर ‘आवारपन २’चे पोस्टर शेअर करत पतीसाठी एक खास आणि भावनिक पोस्ट लिहिली. परवीनने म्हटले की,” इम्रानला हा टप्पा गाठण्यासाठी तब्बल २३ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास करावा लागला.”
परवीन हाश्मी नेमकं काय म्हणाली?
“हा टप्पा गाठायला एमीला २३ वर्षे लागली… २३ वर्षांचा संयम, समर्पण, विश्वास, भक्ती आणि अगणित आशीर्वाद व प्रार्थना!!” तिने पोस्टमध्ये इम्रानच्या कारकिर्दीतील चढ-उतारांचाही उल्लेख केला. त्याच्या प्रवासात काही चित्रपटांनी चांगली कामगिरी केली, तर काही चित्रपट अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरले नाहीत. मात्र, अपयशाचा पुढील निर्णयांवर परिणाम होऊ न देता सातत्याने काम करत राहण्याचा इम्रानचा निर्धार कायम राहिला, अशा शब्दांत तिने पतीचे कौतुक केले.
View this post on Instagram
परवीनने पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, “इम्रानच्या कारकिर्दीत काही शुक्रवार आनंद घेऊन आले, तर काहींनी निराशा दिली. तरीही तो आपल्या मेहनतीवर आणि भविष्यात मिळणाऱ्या यशावर विश्वास ठेवून काम करत राहिला. तो अथकपणे काम करत राहिला, या विश्वासाने की त्याच्या मेहनतीचे फळ एक दिवस नक्की मिळेल आणि आता ते त्याला मिळाले असल्याचे परवीन म्हणाली.
‘आवारपन २’ला मिळत असलेल्या जबरदस्त प्रतिसादानंतरही इम्रान शांत आणि जमिनीवर पाय ठेवून असल्याचे परवीनने आवर्जून सांगितले. ती म्हणाली की, “त्याच्या आजूबाजूचे लोक अनेकदा आश्चर्याने विचारतात की एवढे मोठे यश मिळूनही तो इतका शांत आणि नम्र कसा राहतो. हाच गुण इम्रानला इतरांपेक्षा वेगळे बनवतो.”
इम्रानला चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाचा उल्लेख करताना परवीनने ‘द बा***ड्स ऑफ बॉलीवूड’मधील एका चर्चित संवादाचाही संदर्भ दिला. “एका बाजूला संपूर्ण बॉलीवूड, दुसऱ्या बाजूला इम्रान हाश्मी” ही ओळ इंडस्ट्री आणि चाहत्यांच्या मनात खोलवर रुजल्याचे तिने म्हटले.
दरम्यान, २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘आवारपन’ हा क्राईम आणि इमोशनल ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटात इम्रानने शिवम पंडित या गँगस्टरची भूमिका साकारली होती. दुःखद भूतकाळाशी झुंजणाऱ्या शिवमच्या आयुष्यात आलियाचे पात्र आशेचा किरण घेऊन येते. मात्र, एका अपघातात आलियाचा मृत्यू झाल्यानंतर शिवमच्या आयुष्यात मोठा बदल घडतो. असे कथानक चित्रपटाचे आहे.
या चित्रपटातील ‘तो फिर आओ’ आणि ‘महिया’ यांसारखी गाणी आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. हीच गाणी सिक्वलमध्ये नव्या अंदाजात दाखवण्यात आली आहेत. जवळपास १९ वर्षांनंतर ‘आवारापन २’ चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे.






