70 टक्क्यांपर्यंत कमी होणार आयटी कर्मचारी

पुणे – आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुरुवारी सुमारे 50 टक्केच कर्मचारी उपस्थित होते. ही संख्या 70 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची ग्वाही आयटी कंपन्यांनी दिली आहे. त्याचबरोबर ज्या कंपन्याना उत्पादन क्षेत्रात आहे त्या कंपन्यांनी 50 टक्केपर्यंत मनुष्यबळ कमी करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. दरम्यान, कोणत्याही कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले, पुणे शहर हे आयटी उद्योगाचे हब आहे. नुकतीच आयटी कंपन्यांच्या संघटनेसोबत बैठक घेतली. यामध्ये वर्क फ्रॉम होमबाबत या कंपन्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. प्रत्येक कंपन्यांची वर्क फ्रॉम होमबाबत काही मर्यादा आहेत. डेटा सिक्युरिटी महत्त्वाची आहे. किती लोकांना घरात बसून काम करणे शक्य आहे, तेवढ्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना देणार असल्याचे सांगण्यात आले.
परदेशातून प्रवास करून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगेच कामावर रुजू न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या कर्मचाऱ्यांना घरीच विलगीकरण करून थांबण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.





