Aaditya Thackeray : आयटीयन्सनी आदित्य ठाकरेंसमोर मांडल्या व्यथा
Aaditya Thackeray : दोन किलोमीटर रस्त्याच्या अंतरासाठी तब्बल दीड तासाचा अवधी

हिंजवडी – हिंजवडी आयटी पार्कमध्ये सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी पिक आवरला फेज १ ते फेज ३ या अवघ्या दीड ते दोन किलोमीटर रस्त्याच्या अंतरासाठी तब्बल दीड ते दोन तासाचा अवधी लागतो.
प्रचंड वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे या रस्त्यावरील रूग्णालयात एखाद्या रूग्णाला न्यायचे असल्यास अॅम्बुलेन्स रूग्णालयापर्यंत वेळेत पोहोचू शकत नाही, अशी विदारक स्थिती असल्याची व्यथा आयटीयन्स आणि सोसायटीधारकांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडली.
हिंजवडीतील सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असलेल्या लक्ष्मी चौकात पाहणी करत आदित्य ठाकरे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हिंजवडीतील मेट्रो स्टेशनचीही त्यांनी पाहणी करीत कामाचा आढावा घेतला.
शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर आयटीयन्स, सोसायटीधारक यांच्यासोबत बसून त्यांनी समस्या जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थी व नागरिकांनी आदित्य यांच्यासमोर आपली कैफीयत मांडली.
परवानगी मिळत नसते, रस्त्यावर उतरावे लागते
आयटीयन्सच्या विविध मागण्यांसाठी ६ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन करणार असल्याची घोषणा यावेळी जमलेल्या आयटीयन्सने केली. प्रशासनाच्या कारभाराविरोधात आम्हाला आंदोलन करायचे आहे. मात्र, पोलिसांकडे आंदोलनासाठी परवानगी मागितल्यास नकार दिला जातो, असे बैठकीत काही आयटीयन्सनी आदित्य ठाकरे यांना सांगितले.
त्यावर आदित्य ठाकरे यांनी आंदोलनासाठी कधीच परवानगी मिळत नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते. आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला आंदोलन करावेच लागते. जेन झीने हे दिल्लीत दाखवून दिले आहे. तुम्ही आंदोलन करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वासही ठाकरे यांनी यावेळी दिला.
हिंजवडीला स्वतंत्र महानगरपालिका हवी…..
हिंजवडी आयटी पार्क परिसरात हिंजवडीसह माण, मारूंजी, नेरे. जांबे,कासारसाई अशा अनेक ग्रामपंचायती आहेत. मात्र, रस्ते, पाणी, सांडपाणी, कचरा, वीज या सुविधा पुरविताना या ग्रामपंचायतींवर प्रचंड ताण येत आहे. त्यासाठी परिसरात स्वतंत्र महानगर पालिका निर्माण करावी, अशी मागणीही आम्ही दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेल्यावर्षी केली होती.
अजितदादाही याबाबत सकारात्मक होते. आम्ही प्रत्येक कामासाठी एमआयडीसी, पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी या विभागाकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे स्वतंत्र महापालिकेसाठी विरोधी पक्षांनी देखील सरकारकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.
यावेळी नागरिकांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे
- मुख्य रस्त्यांवर रस्ता रुंदीकरण होण्याऐवजी पुन्हा अतिक्रमणे होऊ लागली आहेत.
- सोसायट्यांमधील कचर्याचा प्रश्नही गंभीर आहे. कचरा वेळेवर उचलला जात नाही. विलगीकरण केले जात नाही. ग्रामपंचायतीची यंत्रणा अपुरी पडते.
- मुळशी धरणातून पाणी आणण्याचा विषय गेल्या कित्येक वर्षापासून चर्चेत आहे. मात्र, निर्णय काहीच होत नाही.
- हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये सुमारे चार ते पाच लाख कर्मचारी दररोज येजा करतात.त्यांना तासनतास वाहतूक कोंडी मध्ये अडकून पडावे लागते.
- पादचारी प्रवाशांना जीव मुठीत धरूनच येजा करावी लागते.
- रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे फुटपाथ कुठेच दिसत नाहीत.
- मागील वर्षभरात या परिसरात रस्ते अपघातात १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.





