PMP: पीएमपीला दिवसात विक्रमी अडीच कोटींचे उत्पन्न
PMP: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) १७ ऑगस्ट रोजी एक दिवसात तब्बल २ कोटी ५१ लाख १५ हजार ६४ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे.

सुट्टी, रिक्षा संप. सणाशिवाय एवढा महसूल मिळविण्याची पहिली वेळ
PMP: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) १७ ऑगस्ट रोजी एक दिवसात तब्बल २ कोटी ५१ लाख १५ हजार ६४ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. रोख तिकीट, पास आणि मोबाइल ॲपसह पर्यटन बसमधून हे उत्पन्न मिळाले आहे.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्या नियोजनामुळे, कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे ही कामगिरी करता आली असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले.
यात सर्वाधिक वाटा तिकीट विक्रीचा होता. १ कोटी ५९ लाख १६ हजार ४०३ रूपये तिकिट विक्रीतून मिळाले. बस पासमधून ५७ लाख २ हजार ७३०, मोबाइल ॲप बुकिंगमधून ३३ लाख ५० हजार ९३१, पुणे दर्शन व पर्यटन बसमधून १ लाख ४५ हजार उत्पन्न मिळाले आहे.या दिवशी दोन्ही शिफ्टमध्ये १ हजार ७६७ बसेस रस्त्यावर धावत होत्या. त्यामध्ये पीएमपीएमएलच्या ६५३ पैकी ५२४ बसेस, तर भाडेतत्त्वावरील (कॉन्ट्रॅक्ट) १ हजार ३८८ पैकी १ हजार २४३ बस कार्यरत होत्या.
पीएमपीएमएलच्या इतिहासात आतापर्यंतचे सर्वोच्च उत्पन्न रक्षाबंधनाला (२०२५) २ कोटी ६१ लाख रुपये मिळाले होते. १७ ऑगस्ट २०२६ रोजी कोणताही सण किंवा संप नसताना, केवळ दैनंदिन नियोजनातून महामंडळाने विक्रमी कमाई केली. सणाविना एवढा मोठा महसूल मिळण्याची ही पहिलीच वेळ. यापूर्वी २०२२ मधील रिक्षा संपात २ कोटी ४ लाख, तर २०२३ मध्ये दिवाळीनंतर २ कोटी ६ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते.
या उल्लेखनीय कामगिरीमध्ये प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याचा वाटा आहे. एकजुटीने केलेले नियोजन, शिस्तबद्ध कामकाज, वेळेचे काटेकोर नियोजन, प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वर्तन आणि उत्पन्नवाढीची सकारात्मक भावना यामुळे ही कामगिरी साध्य झाली.
– महेश आव्हाड – अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल





