Satara | उन्मत्त सत्ताधाऱ्यांचा बिमोड मतदारच करतील

पाचगणी, (प्रतिनिधी) – छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन किल्ले प्रतापगड येथून मार्गस्थ झालेल्या ‘परिवर्तन निर्धार यात्रे’ला महाबळेश्वर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नागरिकांना आता परिवर्तनाचा निर्धार केल्याचे काँग्रेसचे नेते विराज शिंदे यांनी सांगितले.
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरु झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात महाबळेश्वर तालुक्यातील 68 गावांना या यात्रेने भेट दिली. याप्रसंगी नागरीकांनी आपल्या अडीअडचणी शिंदे यांच्यापुढे मांडल्या. हा भाग अतिदुर्गम असून येथे संचार, संपर्काची साधने अतिशय तोकडी आहेत.
येथे त्यामानाने सुविधा देखील अतिशय कमी असून आरोग्य, शिक्षण, दळणवळण या आघाडीवरील कामगिरी अतिशय निराशाजनक आहे. विद्यमान आमदार या भागात फिरकलेही नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितल्याचे विराज शिंदे म्हणाले.
शिंदे म्हणाले की, “विद्यमान व्यवस्थेच्या विरोधात किल्ले प्रतापगड येथून आई भवानी माता तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन परिवर्तन निर्धार यात्रा सुरू केली आहे.
याच किल्ले प्रतापगडावर बलाढ्य ताकतीचा, अहंकारी व उन्मत्त अफजलखानाचा कोथळा महाराजांनी काढला होता. त्याचप्रमाणे या मतदार संघातील अहंकारी व उन्मत्त स्वकेंद्रित अशा व्यवस्थेचा बिमोड मतदार करतील”, असेही शिंदे म्हणाले.
गेली ४ दिवस ही यात्रा सुरु असून यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत आहेत. लोक समस्या मांडत आहेत, त्यांना आता खरोखरीच परिवर्तन हवं आहे. अनेक तरुण या परिवर्तनाचा हिस्सा होऊ इच्छित आहेत. असेही शिंदे यांनी कळविले आहे.





