कुत्रा कधी कोणाला चावेल हे सांगणे अशक्य; सुनावणीच्या वेळी खंडपीठाची टिप्पणी

नवी दिल्ली : कुत्र्याच्या मनात नेमके काय चालले आहे आणि तो कधी एखाद्याला चावू शकतो हे सांगणे अशक्य आहे असे भटक्या कुत्र्यांच्या विषयावरील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
७ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने शाळा, रुग्णालये, क्रीडा संकुल, बस स्टँड आणि रेल्वे स्थानक यासारख्या संस्थात्मक परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे आणि योग्य नसबंदी आणि लसीकरणानंतर त्यांना आश्रयस्थानांमध्ये हलवण्याचे निर्देश दिले होते.
खंडपीठाने म्हटले की, भटक्या कुत्र्यांमुळे केवळ रेबीजचा धोकाच नाही तर रस्ते अपघातांचाही धोका असतो. श्वानप्रेमींचे प्रतिनिधित्व करणारे वकील कपिल सिब्बल म्हणाले, सर्व कुत्र्यांना आश्रयस्थानांमध्ये ठेवणे शक्य नाही. ते आर्थिकदृष्ट्याही अव्यवहार्य आहे. ते मानवांसाठीही धोकादायक आहे. हे वैज्ञानिकदृष्ट्या केले पाहिजे. समस्या अशी आहे की कायदे पाळले जात नाहीत. सर्व कुत्र्यांना पकडणे हा उपाय नाही. त्यावर उपचारापेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला असतो असे न्या. संदीप मेहता यांनी नमूद केले.
न्यायाधीश म्हणाले, आम्ही फक्त नियमांचे पालन होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, जे अद्याप झालेले नाही. ज्या राज्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू.





