Javed Akhtar: “भीतीवर मात करून सत्यासाठी उभं राहणं गरजेचं”; शबाना आजमींच्या धाडसाचं जावेद अख्तरांकडून कौतुक
Javed Akhtar जावेद अख्तर नुकतेच एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी शबाना आजमी यांच्या सामाजिक आणि आंदोलनातील सहभागाच्या आठवणी सांगितल्या.

Javed Akhtar: अभिनेत्री शबाना आजमी आणि गीतकार जावेद अख्तर ही जोडी केवळ त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानासाठीच नाही, तर सामाजिक प्रश्नांवर घेतलेल्या भूमिकेसाठीही ओळखली जाते. नुकत्याच दिल्लीमध्ये झालेल्या सीजेपीच्या विरोध प्रदर्शनात शबाना आजमी सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनात सहभागी होण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल जावेद अख्तर यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत भाष्य केलं आहे. पत्नीच्या धाडसाचं कौतुक करताना त्यांनी, “मला तिचा अभिमान आहे”, असं म्हटलं. जावेद अख्तर नुकतेच एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी शबाना आजमी यांच्या सामाजिक आणि आंदोलनातील सहभागाच्या आठवणी सांगितल्या.
“मला माहीत होतं, ती जाणारच”
जावेद अख्तर यांनी सांगितलं की, ते लंडनमध्ये असताना शबाना यांनी त्यांना फोन करून दिल्लीतील आंदोलनात सहभागी होणार असल्याचं सांगितलं होतं. शबाना यांनी आपण आंदोलनात जाऊ का, असं विचारल्यानंतर त्यांना तिच्या निर्णयाची कल्पना आली होती.
जावेद म्हणाले की, त्यांनी शबाना यांना आंदोलनात जाण्यापासून कधीही रोखलं नाही. त्यांच्या मते, त्या क्षणी शबाना यांच्यातील जुना लढाऊ स्वभाव पुन्हा जागा झाला होता. त्यामुळे त्या आपला निर्णय बदलणार नाहीत, हे त्यांना माहीत होतं. त्यांनी पुढे सांगितलं की, शबाना यांनी याआधीही सामाजिक आणि आंदोलनाशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनात सहभागी होणं त्यांच्यासाठी काही नवीन नव्हतं.

Shabana Azmi and Javed Akhtar
शबाना यांच्या अटकेचीही आठवण
मुलाखतीदरम्यान जावेद अख्तर यांनी शबाना यांच्या आंदोलनातील जुन्या सहभागाची आठवणही सांगितली. एकदा शबाना मुंबईत उपोषणाला बसल्या होत्या. त्या वेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर जावेद अख्तर स्वतः त्यांना जामिनावर सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते.
जावेद म्हणाले की, अशा परिस्थितीत भीती वाटत नाही असं नाही. मात्र काही वेळा भीतीवर मात करून आपल्या मतासाठी आणि सत्यासाठी आवाज उठवावा लागतो. अन्यथा स्वतःच्या मनाला उत्तर देणं कठीण होतं.
आंदोलन थांबवण्यासाठी आधी केला होता प्रयत्न
शबाना आजमी यांनी यापूर्वी सांगितलं होतं की, त्या आणि जावेद अख्तर यांनी दिल्लीतील आंदोलन सुरू होण्यापूर्वीच तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. सरकार आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संवाद व्हावा, अशी त्यांची इच्छा होती.
यासाठी दोघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून परिस्थितीवर तोडगा काढावा, अशी विनंती त्यांनी केली होती. मात्र पत्र पाठवल्यानंतर तीन दिवस उलटूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शबाना आजमी यांनी स्वतः आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
शबाना यांच्या या भूमिकेचं जावेद अख्तर यांनी समर्थन केलं. त्यांच्या मते, सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेताना भीती वाटणं स्वाभाविक आहे. मात्र योग्य वाटणाऱ्या गोष्टीसाठी आवाज उठवण्याचं धैर्यही तितकंच महत्त्वाचं आहे.
शबाना आजमी यांची सामाजिक प्रश्नांवरील सक्रियता अनेक वर्षांपासून पाहायला मिळते. त्यांच्या या भूमिकेची आठवण करून देताना जावेद अख्तर यांनी पत्नीच्या धाडसाबद्दल अभिमान व्यक्त केला. त्यांच्या वक्तव्यामुळे या दोघांच्या नात्यातील परस्पर आदर आणि एकमेकांच्या विचारांना दिलेलं स्वातंत्र्यही अधोरेखित झालं आहे.





