Krishna Ashtikar : “अशा नेत्यांमुळेच त्यांना…”; सुषमा अंधारेंच्या टीकेनंतर नागेश पाटील आष्टीकरांचा मुलगा आक्रमक
Krishna Ashtikar : या सहा खासदारांमध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर देखील आहेत. त्यांच्यावर देखील सुषमा अंधारेंनी जोरदार टीका केली.

Krishna Ashtikar : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मोठा डाव टाकत अॅापरेशन टायगरला अंतिम रुप दिल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडील सहा खासदारांना गळाला लावण्यात शिंदेंना यश आले आहे. या सहाही खासदारांना एका प्रसिद्ध हॅाटेलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे. याचे कारण म्हणजे त्यांचे मनपरिवर्तन होऊ नये म्हणून. या सगळ्या घडामोडीत आजचा दिवस महत्वाचा मानला जात आहे.
शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन असून, या वर्धापन दिनादिवशी सहा खासदार मंचावर दिसतील अशी चर्चा होती. मात्र, हे सहाही खासदार आज दिसणार नसल्याची माहिती समोर आली आहे. या सहा खासदारांच्या बंडखोरीमुळे उबाठा गट आक्रमक झाला आहे. उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली आहे. या सहा खासदारांमध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर देखील आहेत. त्यांच्यावर देखील सुषमा अंधारेंनी जोरदार टीका केली.
टीकेला जोरदार प्रत्युत्तर
या टीकेला आता नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा आष्टीकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एका न्यूज चॅनेलसोबत संवाद साधताना कृष्णा आष्टीकर म्हणाले, “सुषमा अंधारे यांच्या आरोपांना उत्तर देण्यास मी बांधील नाही. त्यांनी आमच्या संपूर्ण कुटुंबावर टीका केल्याचे ऐकून वाईट वाटले. वडील एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात असण्याची उदाहरणे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गजानन कीर्तिकर आहेत, तर त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आमच्याबाबत अनावश्यक चर्चा करण्याचे कारण नाही,” अशा शब्दांत अंधारेंच्या टीकाला कृष्णा आष्टीकरांनी प्रत्युत्तर दिले. तसेच अशा नेत्यांमुळेच त्यांना वीट आला असावा. आमच्यावर व्यक्त होण्याचं काही कारण नव्हते, असेही ते म्हणाले.
कृष्णा आष्टीकरांनी स्पष्ट केली भूमिका
कृष्णा आष्टीकर यांनी आपण अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले. “मी उद्धव ठाकरेंचा कार्यकर्ता आहे आणि माझ्या भूमिकेबाबतची सर्व उत्तरे मी फक्त त्यांनाच देणार आहे. सुषमा अंधारे यांना उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही. मी उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कात असून सर्व घडामोडी त्यांना कळवल्या आहेत,” असे ते म्हणाले.
दरम्यान, नागेश पाटील आष्टीकर हे गेल्या दोन दिवसांपासून संपर्काबाहेर असल्याची चर्चा सुरू आहे. ते कथित ‘ऑपरेशन टायगर’चा भाग बनल्याचे सांगितले जात असून लवकरच ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अॅापरेशन टायगरची औपचारिक घोषणा होऊन याबाबतची सविस्तर माहिती कधी समोर येते याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानावर होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात सहा खासदार पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांनी दुजोरा दिलेला नाही. 19 जून रोजी कोणताही पक्षप्रवेश होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, पुढील राजकीय घडामोडी 20 जूननंतर घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या वर्धापन दिन सोहळ्यात एकनाथ शिंदे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
हेही वाचा : Monsoon Update: रखडलेला मान्सून सक्रिय होणार; 8 दिवस राज्यात धो-धो पावसाची शक्यता





