#TataAirbusProject : महाराष्ट्रातातले महत्वाचे प्रकल्प इतर राज्यात पळविले जाताहेत ही चिंताजनक बाब – छनग भुजबळ

नाशिक – सुमारे 22 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असतांना सदरचा प्रकल्प गुजरातला होत आहे. महाराष्ट्रात येणारे अनेक महत्वाचे प्रकल्प हे इतर राज्यात पळविले जात आहे, ही बाब महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय चिंताजनक बाब आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथे माध्यमांशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीत काम करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सद्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून दिल्लीत आपल वजन वापरून यापुढे तरी किमान कुठलाही प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. तसेच अधिक गुंतवणूक येईल याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला लवकरच मोठा प्रकल्प केंद्राकडून गिफ्ट मिळणार आहे, असे सांगितले. मात्र एकामागे एक प्रकल्प इतरत्र जात आहे. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून देशाचे नेते हे संपूर्ण राष्ट्राचे नेते आहे. त्यांनी केवळ गुजरातचे नेते म्हणून मर्यादित राहू नये, असा टोला छगन भुजबळ यांनी यावेळी लगावला.
पुढे ते म्हणाले की, सप्टेंबर 2021 मध्ये भारतसरकारने देशात गुंतवणुकीसाठी एअरबस या कंपनीशी 22 हजार कोटी रुपयांचा करार केला होता. या विमान बनविणाऱ्या कंपनीचे काम टाटा कंपनीकडे आले. याबाबत लगेचच दि. 31 ऑक्टोबर 2021 रोजी हा प्रकल्प नाशिकच्या ओझर मध्ये कार्यरत असलेल्या एचएचएल या अनुभवी कंपनीत राबविण्यात यावा तुम्हाला लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवू अशी विनंती आपण रतन टाटा यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याने दुःख आहे. अनेक प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राला डावलल जात आहे. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ही बाब अतिशय चिंताजनक असून महाराष्ट्रातील तरुणांनी केवळ आरत्या, मोर्चे, दहीहंडी, आणि फटाके फोडणे इथपर्यंतच मर्यादित रहायचे का ? असा सवाल देखील भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला.





