“कमाल वाटते, बॅगमध्ये चक्क पैसे दिसत असताना…”; अंजली दमानियांनी थेट फोटो शेअर करत दिलं शिरसाटांना ओपन चॅलेंज

Sanjay Shirsat Viral Video | सामाजिक न्यायमंत्री व शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री संजय शिरसाट सध्या अडचणीत सापडले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट हॉटेलमध्ये पैशांच्या बॅगा घेऊन बसल्याचा दावा केला आहे. ज्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या प्रकरणी शिरसाट यांच्यावर राज्यभरातून टीका होण्यास सुरुवात झाल्याननंतर त्यांनी हा व्हिडीओ त्यांच्या घरातील बेडरूमधील असल्याचे म्हणत आरोप फेटाळून लावले आहेत. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संजय शिरसाट यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
“मला संजय शिरसाटांची कमाल वाटते. बॅगमध्ये चक्क पैसे दिसत असताना, ते पैसे नाही, कपडे असतील असे शिरसाट म्हणूच कसे शकतात? मी त्या व्हिडीओला झूम करून फोटो काढला आहे. “हा माझ्या घरच्या व्हिडिओ आहे “ असे ते म्हणत आहेत… त्यांच्यात हिम्मत असेल आणि ते खरं बोलत असतील तर आजच्या आज त्यांनी त्यांच्या घरी माध्यमांना नेऊन दाखवावे की जी रूम व्हिडीओमध्ये दिसत आहे ती खरंच त्यांच्या घरची आहे,” असे आव्हान अंजली दमानियांनी दिले आहे.
मला संजय शिरसाटांची कमाल वाटते.
बॅग मधे चक्क पैसे दिसत असतांना, ते पैसे नाही, कपडे असतील असे शिरसाट म्हणूच कसे शकतात ? मी त्या विडिओला झूम करून फोटो काढला आहे.“हा माझ्या घरच्या वीडियो आहे “ असे ते म्हणत आहेत… त्यांच्यात हिम्मत असेल आणि ते खरं बोलत असतील तर आजच्या आज त्यांनी… pic.twitter.com/ZluMlMLf2A
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) July 11, 2025
“मला ह्यात फक्त एक गोष्ट चुकीची वाटते की कोणाच्याही बेडरूममध्ये CCTV लावणे अतिशय चुकीचे आहे,” असेही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. शिरसाटांच्या या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात गदारोळ होण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांचे आरोप
संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मंत्री संजय शिरसाट एका खोलीमधील बेडवर बसून फोनवर बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये बेडशेजारी एक बॅग, संजय शिरसाट यांचा पाळीव श्वान देखील दिसत आहे. शिरसाट यांच्या बाजूला पैशांनी भरलेल्या बॅगा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आयकर विभागाच्या नोटिशीनंतर शिरसाटांचा हा व्हिडीओ माझ्याकडे आला आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
शिरसाट यांचे स्पष्टीकरण
या आरोपांवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “व्हिडीओत जे घर दिसतंय ती माझी बेडरुम आहे. मी बनियनवर बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा आहे. तिथे एक बॅग ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होतो की मी कुठूनतरी प्रवास करून आलो आहे. मी कपडे काढले आहेत आणि बेडवर बसलो आहे. तसेच एवढे सारे पैसे मी बॅगमध्ये कसे ठेवेन. घरातील अलमाऱ्या मेल्या आहेत का? एवढे सारे पैसे असते तर मी ते अलमारीमध्ये ठेवले असते. त्यांना पैशांशिवाय काहीही दिसत नाही. माझ्या बेडरूमध्ये प्रवासातून आणलेली बॅग आहे,” असं स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिलं.
हेही वाचा:
दिल्लीत चार मजली इमारत कोसळली; अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता





