‘ते’ दोन व्हायरल व्हिडिओ स्टेटसवर झळकले; एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यांची ‘आठवण’

पुणे – या विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर दोन व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यामध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यांची आठवण करून दिली जात आहे.
निवडणूक निकाल जाहीर होताच विशेषत: फडणवीस यांचा “मेरा पानी उतरता देख किनारें पर घर मत बसा लेना…मैं समंदर हुॅं, लौटकर जरूर आउंगा’ हा व्हिडिओ अनेकांच्या व्हाॅट्स अॅप स्टेटसवर झळकत होता. याबद्दलचा प्रसंग असा, की २०१९ च्या विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्रिपद फडणवीस यांच्या दृष्टीक्षेपात होते.
त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची साथ दिली. त्यामुळे तब्बल १०५ आमदारांचे संख्याबळ असतानाही फडणवीस यांना विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे लागले. त्यानंतर झालेल्या हिवाळी अधिवेशनात फडणवीस यांनी आपल्या मनोगताद्वारे विश्चास व्यक्त करत वरील शेर सादर केला होता.
तर, शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या सोहळ्यानंतर एक अधिवेशन आयोजित करण्यात आले. त्यावेळी शिंदे म्हणाले होते की, “माझ्यासोबत जे ५० आमदार आले, त्यातील एक जणही मी पडू देणार नाही. इतकेच नाही तर, मी आणि फडणवीस आम्ही दोघे मिळून दोनशे आमदार निवडून आणू…आणि नाही आले तर….’ त्यावेळी शिंदे यांचे हे वक्तव्य खूप गाजले. त्यांच्या याच वक्तव्याचा व्हिडिओ यावेळच्या निवडणूक निकालानंतर व्हायरल झाला. तो देखील अनेकांच्या व्हाॅट्स अॅप स्टेटसवर दिसून आला.





