“तीन-तीन कोटी खर्च होतो, 100 बोकडं…”; संजय गायकवाडांच्या विधानाची चर्चा, वडेट्टीवार म्हणाले “त्यांना खोके आणि बोक्यांची सवय..”

Sanjay Gaikwad : राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. ३१ जानेवारीपर्यंत या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वेाच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या दरम्यान निवडणुका होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे राजकीय पक्षांनी तयारीला वेग घेतला असून, इच्छूक उमेदवारांची तिकिट मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. अशातच आता या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तीन-तीन कोटीपर्यंत खर्च होतो, असे म्हणत संजय गायकवाड यांनी आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्या आहेत का? एक-एक, दोन-दोन, तीन-तीन कोटी तर काही ठिकाणी शंभर बोकडं एका व्यक्तीकडून दिली जातात. इतक्या महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो, असं वक्तव्य केलं आहे. त्यांनी हे वक्तव्य बुलढाण्यात बोलताना केलं आहे.
पुढे बोलताना गायकवाड म्हणाले, आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे की, जे धोरण चिखलीचे ठरेल, जे मलकापूरचे ठरेल ते धोरण जर बुलढाणा ठरत असेल तर आम्ही युतीला तयार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार. आम्हाला भाजप-शिवसेना युती पाहिजे आहे.
छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते त्यावेळेस….
ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे. कारण आम्ही विधानसभेला युती करतो, लोकसभेला युती करतो असंही गायकवाड म्हणाले. ज्या वेळेस छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते त्यावेळेस त्यांना आपण वाऱ्यावर सोडतो. त्यांनी पैसे खर्च करून काय मातीत जायचे आहे का? असा सवालही संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
वडेट्टीवारांनी साधला निशाणा
आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांना खोके आणि बोक्यांची सवय लागलेली आहे. बोके म्हणजे बोकड… त्यांच्या पोटात होतं ते ओठात आलं. संजय गायकवाड हे सत्य बोलतात, अस म्हणत वडेट्टीवारांनी संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय निर्णय घेणार?
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र निवडणुकीला सामोर जाणार की संबंधित ठिकाणची परिस्थिती पाहून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला जाणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे आगामी काळात स्थानिकस स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची गणित काय ठरतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
हेही वाचा : टॅरिफ, H-1B व्हिसा अन् GST सुधारणा… ; पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार





