श्रीहरिकोटा – अंतराळ क्षेत्रात भारताने नवा इतिहास लिहिला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) रविवारी एकाच वेळी सात उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. यामध्ये एक स्वदेशी आणि सिंगापूरच्या सहा उपग्रहांचा समावेश आहे. हे उपग्रह आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून “पीएसएलव्ही-सी 56′ रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले आहेत.
सिंगापूरने पृथ्वीचे निरीक्षण करणारे उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी इस्रोची मदत घेतली. त्यासाठी इस्रोच्या पीएसएलव्ही-सी 56 रॉकेटद्वारे सिंगापूरच्या डीएस-एसएआर आणि इतर 6 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. या उपग्रहांचे रविवारी सकाळी 6.30 वाजता यशस्वी प्रक्षेपण झाले.
“चांद्रयान -3′ या महत्त्वाकांक्षी योजनेचे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर इस्रोची ही आणखी एक यशस्वी कामगिरी आहे. इस्रोच्या विश्वसनीय रॉकेट पीएसएलव्हीचे हे 58 वे उड्डाण होते. तसेच “कोअर अलो कॉन्फिगरेशन’ असलेले इस्रोच्या पीएसएलव्हीचे 17 वे उड्डाण होते. पीएसएलव्ही रॉकेटला इस्रोचा वर्कहॉर्स म्हणतात. या रॉकेटच्या माध्यमातून उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत यशस्वीरीत्या स्थापित करता येते.
वर्षातील तिसरी व्यावसायिक मोहीम
भारतीय अंतराळ संस्थेची या वर्षातील ही तिसरी व्यावसायिक मोहीम आहे. इस्रोने यापूर्वी मार्चमध्ये एलएमव्ही-3 रॉकेटसह ब्रिटनच्या वन-वेव्ह संबंधित 36 उपग्रह प्रक्षेपित केले होते. यानंतर एप्रिलमध्ये पीएसएलव्ही रॉकेटमधून सिंगापूरचे 2 उपग्रह अंतराळात पाठवण्यात आले.
डीएस-एसएआर उपग्रह सिंगापूरच्या संरक्षण विज्ञान, तंत्रज्ञान एजन्सी आणि एसटी अभियांत्रिकी यांच्या एकत्रित प्रयत्नांनी विकसित करण्यात आले आहेत. या उपग्रहाचे प्रक्षेपण झाल्यानंतर हा उपग्रह आता सिंगापूरच्या विविध संस्थांच्या गरजांसाठी वापरण्यात येणार आहे.
डीएस-एसएआर उपग्रह इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजकडून विकसित करण्यात आले आहेत. यामध्ये सिंथेटिक अपर्चर रडारचा (एसएआर) समावेश करण्यात आला आहे. यामुळे या उपग्रहाला दिवसा आणि रात्री हवामानातील सर्व बदलांची छायाचित्रे घेता येणार आहेत.