दुबई : इस्रायलला गाझा पट्ट्यामध्ये हमासच्या ताब्यात असलेल्या आपल्या ओलिसांची अजिबात चिंता नाही. त्याऐवजी गाझा राहण्यायोग्य राहू नये, यासाठी इस्रायलचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका कतारचे सत्तारुढ अमिर शेख तमिम बिन हमाद अल थानी यांनी केली आहे. इस्रायलने गेल्या आठवड्यात हमासच्या म्होरक्यांना लक्ष्य करण्यासाठी कतारची राजधानी दोहामध्ये हवाई हल्ला केला होता. त्याचा निषेध करण्यासाठी कतारने बोलावलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जर इस्रायलला हमासच्या नेत्यांना ठार मारायचेच असेल, तर युद्धबंदीसाठीच्या वाटाघाटी का केल्या जात आहेत? युद्धबंदीसाठी मध्यस्थी करणाऱ्यांनाच का लक्ष्य केले जाते आहे? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. या शिखर परिषदेत सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल-फताह अल-सिसी आणि सीरियाचे अंतरिम अध्यक्ष अहमद अल-शारा यांच्यासह विविध प्रादेशिक नेत्यांनी हजेरी लावली. याशिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ हे देखील या परिषदेला उपस्थित राहिले आहेत. कतारमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे इस्लामी देशांमध्ये संतापाची लाट उमटली असून दोहामध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेला अनेक देशांचे परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधान श्रेणीचे नेते उपस्थित राहिले आहेत. या परिषदेतून कतारला नेमके काय साध्य करायचे आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र इस्रायलच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्लामी देशांची एकजूट निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जाते आहे.