देर अल-बलाह (गाझा पट्टा) – इस्रायलने गाझा पट्ट्यामध्ये मारा सुरू ठेवला असून गेल्या २४ तासात इस्रायलने संपूर्ण गाझा पट्ट्यात केलेल्या माऱ्यामध्ये किमान ६० जण ठार झाले आहेत. अत्यल्प मदत गाझामध्ये जाऊ देऊन इस्रायल हमासवर दबाव आणू पहात आहे, असे गाझातील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. आज ठार झालेल्या ६० जणांमध्ये दक्षिणेकडील खान युनिस शहरातील १०, मध्य गाझातील देर अल-बलाह शहरातील ४ आणि जबालिया शहरातील शरणार्थ्यांच्या छावणीतील ९ जणांचा समावेश आहे. इस्रायलच्या या व्यापक आक्रमकतेवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठी टीका होते आहे. गाझा पट्ट्यातल्या पॅलेस्टिनींसाठी अधिक मदत जाऊ देण्यासाठी इस्रायलवर दबाव देखील येतो आहे. संयुक्त राष्ट्राच्या एजन्सींबरोबर इस्रायलचा मित्र देश असलेल्या अमेरिकेनेही इस्रायलच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एक दिवस आगोदरच इस्रायलच्या रणगाड्यांनी आणि ड्रोननी गाजाच्या उत्तरेकडील रुग्णालयांवर मारा केला होता. यामुळे या रुग्णालयांना आग लागली होती आणि इमारतींचे मोठे नुकसान देखील झाले होते. हमासच्या ताब्यात असलेल्या सर्व ५८ ओलिसांची सुटका होईपर्यंत हे हल्ले सुरू राहतील, असे इस्रायलने म्हटले आहे. दूतावासातील हत्येप्रकरणी एका संशयितावर आरोप – अमेरिकेत इस्रायलच्या दूतावासातल्या दोन कर्मचाऱ्यांच्या हत्ये प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. गुरुवारी न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, आपण या हत्या पॅलेस्टाईनसाठी केल्याचे या संशयिताने पोलिसांना सांगितले. पॅलेस्टिनींच्या स्वतंत्र देशाच्या मागणीला पाठिंबा दिलयाबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी ब्रिटन, फ्रान्स आणि कॅ’नडावर टीका देखील केली आहे.