गाझातील युद्ध सुरू ठेवण्याचा इस्रायली मंत्रिमंडळाचा निर्णय; संपूर्ण गाझा ताब्यात घेण्याची योजना

जेरुसलेम – इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील इस्रायलमधील युद्धकालीन मंत्रिमंडळाने काल गाझामधील पायदळाची कारवाई सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. हमासविरोधातली ही कारवाई आता आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
तसेच गाझा पट्ट्याचा संपूर्ण भूप्रदेश ताब्यात घेण्याच्या योजनेच्या अनुषंगाने आता इस्रायलच्या लष्कराची कारवाई सुरू राहणार आहे. या नवीन योजनेनुसार होणारी कारवाई दीर्घकाळ चालणारी असणार असून त्याच्या अंमलबजावणीला काही महिने देखील लागू शकणार आहेत, असे माहितगार सूत्रांनी म्हटले आहे.
लष्करी कारवाईच्या या नव्या योजनेमध्ये युद्धबंदीचा प्रस्ताव खुला असणार आहे आणि हमासच्या ताब्यात असलेल्या ओलिसांच्या सुटकेसाठी वाटाघाटी देखील सुरू राहणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील आठवड्यात इस्रायलचा दौररा करणार आहेत. त्यावेळी ओलिसांच्या सुटकेसाठीच्या वाटाघाटी पुर्ण होण्याची शक्यता आहे, असे युद्धलकालीन मं६मंडळातील सदस्यांनी म्हटले आहे.
इस्रायलने गाझा पट्ट्यातील एक तृतीयांश भूभागावर यापुर्वीच ताबा मिळवला आहे. ट्रम्प प्रशासनाने घडवून आणलेली युद्धबंदी इस्रायलने धुडकावून पुन्हा कारवाईला सुरुवात केल्यावर उर्वरित भूभाग देखील इस्रायलच्या नियंत्रणाखाली आणण्यात आला आहे.
ही योजना इस्रायलच्या अटींवर युद्धबंदीसाठी वाटाघाटी करण्यासाठी आणि ओलिसांना मुक्त करण्यासाठी हमासवर दबाव वाढवण्याच्या इस्रायलच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या योजनेत लाखो पॅलेस्टिनींना दक्षिण गाझामध्ये विस्थापित करण्याचाही समावेश आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.





