गाझामधील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; 30 जण ठार

देर-अल-बलाह (गाझा पट्टा) – गाझाच्या मध्य भागामध्ये विस्थापित पॅलेस्टिनींनी आश्रय घेतलेल्या शाळेवर इस्रायलने केलेल्या माऱ्यामध्ये किमान ३० जण ठार झाले आहेत. युद्धविरामासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थांबरोबर इस्रायलच्या प्रतिनिधींच्या चर्चेची तयारी सुरू असतानाच इस्रायलने हा हल्ला केला आहे.
अनेक विस्थापितांनी आश्रय घेतलेल्या देर-अल-बलाहमधील मुलींच्या एका शाळेवर झालेल्या माऱ्यामध्ये किमान ३० जण ठार झाले. हा हल्ला हमासचे कमांड आणि कंट्रोल सेंटरला लक्ष्य करण्यासाठी केला गेला होता, असे इस्रायलने म्हटले आहे. या ठिकाणी हमासने आपली शस्त्रे साठवली होती आणि येथून हल्ल्यांचे नियोजन केले जात होते. दहशतवाद्यांनी या ठिकाणाचा वापर लपण्याचा अड्डा म्हणून केला होता. येथून इस्रायलच्या सैन्यावर अनेक हल्ल्यांचे कट केले गेले होते. या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रे दडवून ठेवली गेली होती, असेही इस्रायलने म्हटले आहे.
या शाळेमध्ये हजारो लोकांनी आश्रय घेतला होता. या शाळेच्या परिसरातच वैद्यकीय सुविधा देखील होती, असे गाझामधील नागरी संरक्षण कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. शाळेच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण गाडले गेले असावेत असा संशय आहे. शनिवारी झालेल्या अन्य एका हल्ल्यामध्ये १२ जण ठार झाले असल्याचे हमासच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
युद्धबंदीच्या वाटाघाटी सुरू –
मलींच्या शाळेवरील हल्ला होण्याच्या दुसऱ्याच दिवशी इटलीमध्ये अमेरिका, इजिप्त, कतार आणि अस्रायलच्या प्रतिनिधींमध्ये युद्धबंदीबाबत चर्चा केली जाणार होती. हमासच्या तावडीतील ओलिसांची सुटका आणि युद्धविरामाच्या प्रस्तावाच्या प्रलंबित अंमलबजावणीबाबत ही चर्चा केली जाणार होती. तीन टप्प्यातील युद्धबंदीच्या प्रस्तावाला इस्रायल आणि हमासने तत्वतः मान्यता दिली आहे. मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेच्या संसदेमध्ये केलेल्या भाषणात आपले संपूर्ण उद्दिष्ट साध्य केले जाईपर्यंत इस्रायल युद्ध थांबवणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.





