Israel war on Gaza : हिज्बुल्लाहने इस्रायलवर डागली 200 रॉकेट, वरिष्ठ कमांडर मारला गेल्यावर प्रत्युत्तर…

Israel war on Gaza : – लेबेनानमधील हिज्बुल्लाह या गटाने इस्रायलमधील लष्करी तळांवर तब्बल २०० रॉकेटचा आज मारा केला. इस्रायलने केलेल्या माऱ्यामध्ये हिज्बुल्लाहचा वरिष्ठ कमांडर मारला गेल्यानंतर प्रत्युत्तरादाखल हा हल्ला करण्यात आला.
इराणचा पाठिंबा असलेल्या हिज्बुल्लाहने इस्रायलवर आज केलेला हल्ला आतापर्यंत केलेल्या हल्ल्यांमधील सर्वात मोठा हल्ला होता. इस्रायल आणि लेबेनानमधील दररोजच्या हल्ल्यांमध्ये वाढ व्हायला लागल्यामुळे आता इस्रायल-लेबेनानदरम्यान देखील तणाव वाढायला लागला आहे. हिज्बुल्लाहने केलेल्या हल्ल्यावर इस्रायलकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रीया देण्यात आली नाही. मात्र मोहम्मद नामेन नसीर हा वरिष्ठ कमांडर इस्रायलने बुधवारी केलेल्या माऱ्यात मारला गेल्याच्या वृत्ताला इस्रायलने दुजोरा दिला आहे.
नसीर हा दक्षिण लेबेनानमधील हिज्बुल्लाहच्या ३ प्रमुख विभागांपैकी एका विभागाचा प्रमुख होता. तो ठार झाल्यानंतर काही तासातच हिज्बुल्लाहकडून इस्रायलच्या उत्तरेकडील लष्करी ठिकाणांच्या दिशेने आणि सीरियाच्या गोलान हाईटसच्या दिशेने शेकडो कात्युशा आणि फलाक रॉकेट डागली गेली. या रॉकेटद्वारे मोठी स्फोटके डागली गेली होती. आज देखील अनेक रॉकेट इस्रायलमध्ये डागली गेली.
SCO Summit : दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या देशांना उघडे पाडावे – एस. जयशंकर
इस्रायल आणि लेबेनानमध्ये थेट युद्धाला तोंड फुटू नये यासाठी अमेरिका आणि फ्रान्स प्रयत्नशील आहे. हे युद्ध भडकले तर संपूर्ण अरब जग यामध्ये ओढले जाऊ शकेल, अशी भीती आहे.





