देर-अल-बलाह (गाझा पट्टा) – इस्रायलने गाझामध्ये केलेल्या जोरदार माऱ्यामध्ये आज किमान १८ ठार झाले. हे सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्य होते. तर दक्षिण लेबनानच्या नाबतीह जिल्ह्यात आज पहाटे एका निवासी इमारतीवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात दहा जण ठार झाले आहेत. इस्रायलच्या माऱ्यामध्ये आतापर्यंत ठार झालेल्यांची संख्या ४० हजारापेक्षा जास्त झाल्याचे हमासच्या आरोग्य मंत्रालयाने कालच जाहीर केले होते. तर युद्धबंदीघडवून आणण्याच्या उद्देशाने अमेरिका, इजिप्त आणि कतारच्या प्रतिनिधींबरोबर दोन दिवस वाटाघाटी सुरू होत्या. युद्धबंदी केली जाऊ शकेल, असा विश्वास या प्रतिनिधींनी व्यक्त केल्याच्या दुसऱ्याच दिवशी इस्रायलने हा हल्ला केला. इस्रायल आणि हमास यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून पुढीलआठवड्यात कैरोमध्ये होणाऱ्या वाटाघाटींमध्ये युद्धबंदी करार कशाप्रकारे घडवून आणला जाऊ शकेल, यासाठीचा तपशील निश्चित केला जाणार आहे, असे या तिन्ही देशांच्या प्रतिनिधींनी प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त निवेदनामध्ये म्हटले आहे. हमासच्या ताब्यातील इस्रायली नागरिकांना परत आणणे आणि गेल्या १० महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाला थाबवण्याच्या उद्देशाने हे युद्धबंदीचे प्रयत्न सुरू आहेत. इराण आणि लेबेनानच्या संभाव्य हस्तक्षेपामुळे प्रादेशिक तणाव अधिक वाढू नदेण्याचाही प्रयत्न या मध्यस्थांकडून केला जातो आहे.