जेरुसलेम, (इस्रायल) – मध्यस्थांकडून सुरक्षेचे आश्वासन मिळाल्यानंतर इस्रायलने ११० पॅलेस्टिनी कैद्यांना सोडले आहे. इस्रायली आणि थायलंडच्या ओलिसांच्या सुटकेदरम्यान इस्रायलने हे सुरक्षेचे आश्वासन मध्यस्थांकडून मिळवले. इस्रायली सैन्याने एक पुरुष आणि दोन महिला असे तीन इस्रायली आणि थायलंडचे ५ अशा ८ जणांच्या सुटकेच्या वृत्ताला दुजोरा दिल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांना सोडले. यापूर्वी, इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यास विलंब लावला होता आणि पुढील सुटकेमध्ये ओलिसांच्या सुरक्षित मार्गाची हमी मिळेपर्यंत कैद्यांना सोडले जाणार नाही असे ठामपणे सांगितले होते. आज सोडण्यात येणाऱ्या दहशतवाद्यांची सुटका पुढील टप्प्यात आमच्या ओलिसांची सुरक्षित सुटका होईपर्यंत पुढे ढकलण्यात यावी, असे आदेश पंतप्रधान बेंन्जामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी मीळून दिले होते. सुमारे एक तासानंतर, ज्यांना पुढील टप्प्यात सोडण्यात येणार आहे अशा ओलिसांना सुरक्षित बाहेर पडण्याचे आश्वासन मध्यस्थांनी दिले असल्याचे इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. हमासने या अनुभवातून धडे घेतले पाहिजेत आणि आमच्या ओलिसांच्या सुरक्षित परतीबाबत पुढील टप्प्यात कडक काळजी घेतली पाहिजे, असे इस्रायलच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी संध्याकाळी एक निवेदन जारी करून गाझामधील कैदेतून आज सुटका झालेल्या अगम बर्गर, अर्बेल येहुद आणि गादी मोझेस या तीन इस्रायली ओलिसांचे स्वागत केले. हमासने त्यांची सुटका कशी हाताळली यावरही नेतान्याहू यांनी टीका केली.