जेरुसलेम : गाझा सिटीमधील हमासच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी आपल्या व्यापक लष्करी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे, असे इस्रायलच्या लष्कराने जाहीर केले आहे. आदल्याच दिवशी इस्रायलने गाझा सिटीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार हवाई हल्ले केले होते. त्यापाठोपाठ इस्रायली लष्कराचे प्रवक्ते अविचय अद्राई यांनी व्यापक मोहिमेला सुरुवात झाल्याची घोषणा केली. या व्यापक मोहिमेमुळे हमास – इस्रायलदरम्यानचा संघर्ष अधिकच भडकणार आहे आणि संभाव्य युद्धबंदीची शक्यताही अधिक धूसर झाली आहे. इस्रायलकडून गेल्या अनेक आठवड्यांपासून गाझामध्ये व्यापक लष्करी कारवाईचे इशारे दिले जात होते. आता गाझा जळत असल्याचे इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कात्झ यांनी म्हटले आहे. इस्रायलचे सैन्य दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले करत आहेत. ओलिसांच्या सुटकेसाठी आणि हमासचा पराभव करण्यासाठी इस्रायली सैनिक एखाद्या नायकाप्रमाणे तुटून पडले आहे. जोपर्यंत ही मोहिम पुर्ण होत नाही, तपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि मागेही हटणार नाही, असेही कात्झ म्हणाले. दोन दिवसांपुर्वी इस्रायलमध्ये आलेलेअमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आता कतारमध्ये गेले आहेत. इस्रायलने कतारमध्ये हमासच्या म्होरक्यांना लक्ष्य करण्यासाठी केलेल्या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या कतारच्या अमिरांशी ते संवाद साधणार आहेत. व्यापक कारवाई रोखण्यासाठी फारच कमी अवधी शिल्लक आहे. ही कारवा आता जवळजवळ सुरू झालीच आहे, असे ते इस्रायलमध्ये असताना म्हणाले होते. युद्धापेक्षा वाईट म्हणजे हे युद्ध नेहमीपेक्षा जास्त काळ लांबलेले आहे. हे युद्ध वाटाघाटींतून थांबवणे यालाच आमचे सर्वाधिक प्राधान्य असणार आहे असे त्यांनी सांगितले. पण त्याच बरोबर गाझामध्ये घातक लष्करी कारवाई अधिक तीव्र होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्याबरोबरच्या चर्चेमध्ये रुबिओ यांनी अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चारही केला होता. हमासच्या ताब्यात अजूनही ४८ इस्रायली नागरिक आहेत. त्यापैककी २० जण जिवंत असल्याचा अंदाज आहे. मात्र पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका, स्थायी युद्धबंदी आणि गाझामधून इस्रायली फौजांनी माघार घेतल्यानंतरच या ओलिसांची सुटका केली जाईल, असे हमासने म्हटले आहे. इस्रायलने गाझामध्ये केलेल्या लष्करी कारवाईमध्ये आतापर्यंत ६४ हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. २ लाखांपेक्षा जास्त पॅलेस्टिनींचे पलायन इस्रायलने दिलेल्या इशाऱ्यांमुळे गेल्या महिन्याभरापासून गाझाच्या उत्तरेकडील भागातून सुमारे २ लाख २० हजार पॅलेस्टिनी दक्षिण गाझाकडे पळून गेल्याचे संयुक्त राष्ट्राने सोमवारी म्हटले आहे. गाझा सिटीच्या आजूबाजूच्या परिरामध्ये तब्बल १० लाख पॅलेस्टिनींचे वास्तव्य असल्याचा अंदाज आहेमंगळवारी सकाळी देखील इस्रायलच्या हल्ल्यात किमान २० पॅलेस्टिनी ठार झाले आणि ९० जण जखमी झाले, असे शिफा रुग्णालयाने म्हटले आहे. उद्ध्वस्त झालेल्या इमारतींच्या ढिगार्यांखाली आणखी अनेक मृतदेह असण्याची शक्यता आहे. या हल्ल्यांबाबत इस्रायलच्या सैन्यदलाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दोहा येथील हल्ल्यामुळे कतार संतप्त कतारने बोलावलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अरब आणि मुस्लिम देशांनीही इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. इस्रायलला धडा शिकवण्यासाठी थेट लष्करी कारवाईची मागणी या देशांनी केली नाही. पण दबाव आणून इस्रायलच्या वर्तनात बदल घडवून आणण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. युद्धबंदीसाठी आता कतारच्या जोडीने इजिप्तनेही पुढाकार घेतला आहे. इस्रायलबरोबर उच्चस्तरिय संबंध प्रस्थापित करणारा इजिप्त हा पहिल अरब देश आहे.इस्रायलबरोबर दशकभराचा तणाव संपवलेल्या इजिप्तने मध्यस्थी करण्याचे धोरण अनुसरले आहे. मात्र कतारमधील परिषदेत इजिप्तचे अध्यक्ष अब्देल-फताह अल-सिसी यांनी इस्रायलला शत्रू असे संबोधले आहे.