जेरुसलेम – इस्रायलच्या डझनभर लढाऊ विमानांनी रविवारी येमेनमधील हौथींशी संबंधित ठिकाणांवर जोरदार बॉम्बफेक केली. अलिकडे हौथींनी इस्रायलमध्ये केलेल्या माऱ्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी हा हवाई हल्ला करण्यात आला होता. येमेनमधील होडेडाया बंदराच्या शहरातील उर्जा प्रकल्प आणि अन्य सुविधांवर हे हवाई हल्ले करण्यात आले होते. हौथींनी शनिवारी इस्रायलमधील बेन गुरोन विमानतळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले होते. इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू अमेरिकेवरून परत येत असतानाच हा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला होता. नेतान्याहू यांच्या हत्येसाठी झालेल्या या हल्ल्याला इस्रायलने हवाई हल्ल्याद्वारे उत्तर दिले आहे. हौथी बंडखोरांकडून हमासच्या समर्थनासाठी लाल समुद्रातून होणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. अमेरिका इस्रायलला मदत करत असल्याने अमेरेशी संबंधित जहाजांवरही हौथींकडून क्षेपणांस्त्रांचा मारा झाला होता. हौथींकडून लाल समुद्रातील सागरी वाहतूक विस्कळीत केली गेली. पण थेट इस्रायलच्या भूमीवर हल्ला करण्याचे धाडस आतापर्यंत हौथींनी दाखवले नव्हते. लेबेनॉन आणि गाझामध्ये धुमश्चक्री सुरू असतानाच आता इस्रायलने हौथींच्या ताब्यातल्या भूभागावर हवाई हल्ले करून येमेनकडे मोर्चा वळवला आहे.