इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचा कमांडर इब्राहिम अकील ठार; अमेरिकेने ठेवले होते 60 कोटींचे बक्षीस

तेल अवीव – इस्त्रायली सैन्याने शुक्रवारी लेबनीजची राजधानी बेरूतमध्ये हवाई हल्ला केला. या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या सर्वोच्च लष्करी कमांडरपैकी एक असलेल्या इब्राहिम अकील सह इतर सात ठार झाले असून 59 लोक जखमी झाले. 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून बेरूतच्या दक्षिणेकडील भागात झालेला हा तिसरा हवाई हल्ला आहे. या प्रदेशात सुरू असलेला संघर्ष आता नाटकीयरित्या गाझामधून लेबनॉनकडे वळला आहे.
हिजबुल्लाला गेल्या काही दिवसांपासून इस्रायलकडून अभूतपूर्व हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. यात 16 सप्टेंबर रोजी झालेल्या पेजर हल्ल्याचाही समावेश आहे, जेव्हा हिजबुल्लाह सैनिकांनी वापरलेल्या हजारो संप्रेषण उपकरणांचा अचानक स्फोट होऊ लागला. या घटनेत 37 जणांचा मृत्यू झाला असून 3000 हून अधिक जण जखमी झाले आहेत. पेजर हल्ल्यामागे इस्रायलचा कट असल्याचे हिजबुल्लाहने म्हटले आहे. मात्र इस्रायलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कोण होता इब्राहिम अकील?
इब्राहिम अकील हा हिजबुल्लाच्या सर्वोच्च लष्करी युनिट, रडवान फोर्सेसचा प्रमुख होता. तो फुआद शुकर नंतर हिजबुल्लाह सशस्त्र दलांचा दुसरा कमांडर-इन-चीफ होता. सौदी अल-हदाथ वाहिनीने हिजबुल्लाच्या जवळच्या स्त्रोताचा हवाला देत इब्राहिम अकीलच्या मृत्यूची पुष्टी केली. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या म्हणण्यानुसार, इब्राहिम अकीलने हिजबुल्लाची सर्वोच्च लष्करी संस्था जिहाद कौन्सिलमध्येही काम केले आहे.
अकील हा हिजबुल्लाच्या इस्लामिक जिहाद संघटनेचा प्रमुख सदस्य देखील होता. त्याने एप्रिल 1983 मध्ये बेरूतमधील अमेरिकन दूतावासावर झालेल्या बॉम्बस्फोटासह महत्त्वपूर्ण हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यात 63 जणांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर 1983 मध्ये, यूएस मरीन कॉर्प्सच्या बॅरेक्सवर झालेल्या हल्ल्यात 241 अमेरिकन जवान मारले गेले. त्यादरम्यान अकीलने हिजबुल्लाहच्या सैनिकांना लेबनॉनमध्ये अमेरिकन आणि जर्मन नागरिकांना ओलीस ठेवण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. एप्रिल 2023 मध्ये, अमेरिकेने त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास 7 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 60 कोटी रुपये) बक्षीस जाहीर केले होते.
फुआद शुकरची जुलै 2024 मध्ये हत्या –
या वर्षी 27 जुलै रोजी हिजबुल्लाहने इस्रायलमधील मजदल शम्स येथील फुटबॉल मैदानावर रॉकेट हल्ला केला होता. यामध्ये 12 मुले ठार झाली होती. या हल्ल्यासाठी इस्रायलने फुआद शुकरला जबाबदार धरले. इस्रायलने 30 जुलै 2024 रोजी बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख कमांडर फुआद शुकर ठार केला होता. या हल्ल्यात शुकरचा सहकारी आणि हमासचा नेता सालेह अल-अरुरीही मारला गेला. दरम्यान, इस्रायलने हिजबुल्लाच्या संभाव्य धोक्यांपासून आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आपली मोहीम सुरू ठेवण्याची शपथ घेतली आहे.
आयडीएफ ऑपरेशन सुरू ठेवणार –
इस्त्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) हिजबुल्लाहच्या ऑपरेशन युनिटचा प्रमुख इब्राहिम अकील याला ठार मारल्यानंतर काही तासांनंतर हे विधान आले आहे. आयडीएफचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी सांगितले की, हिजबुल्लाहने इस्रायली नागरिकांवर 8,000 हून अधिक रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि यूएव्हीएस मधून स्फोटके डागली, 60,000 हून अधिक इस्रायलींना त्यांच्या घरातून बाहेर काढले. इस्त्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी हिजबुल्लाचा पूर्ण खात्मा करण्यासाठी आम्ही लेबनॉनच्या सर्व भागात आमची कारवाई सुरू ठेवू, असे त्यांनी सांगितले.





