इस्रायल-इराण युद्धावर ट्रम्प यांच्या भाष्याने रशिया-चीन भडकले ; इशारा देत म्हटले, ‘हा योग्य मार्ग नाही…’,

ISRAEL-IRAN WAR। जगात सध्या तिसऱ्या युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण इराण- इस्रायल दोन्ही देश एकमेकांना संपवण्यासाठी जीवाचं रान करत आहेत . मात्र त्याचा फटका हा संपूर्ण जगाला बसत आहे. त्यात या युद्धाने जग दोन गटात विभागले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच आता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि त्यांचे रशियन समकक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणवरील इस्रायली हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. तसेच नागरिकांवरील हल्ले थांबवण्याचे आवाहन केले.
दोन्ही नेत्यांनी फोनवर सवांद साधला. या झालेल्या संभाषणादरम्यान, शी यांनी पुतिन यांच्याशी इस्रायल-इराण युद्धावर चर्चा केली. तसेच “पश्चिम आशियातील संघर्ष रोखण्यासाठी युद्धबंदी ही तात्काळ प्राधान्य आहे आणि आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्यासाठी बळाचा वापर हा योग्य मार्ग नाही.” असे स्पष्टपणे मत मांडले.
ट्रम्पच्या धमकीनंतर शी जिनपिंग यांची पहिली प्रतिक्रिया ISRAEL-IRAN WAR।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्या आणि इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना लक्ष्य करण्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर या प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षावर शी यांची ही पहिलीच टिप्पणी आहे.
रशियाचे राष्ट्रपती कार्यालय आणि अधिकृत निवासस्थान असलेल्या क्रेमलिनने सांगितले की, राष्ट्रपती पुतिन आणि त्यांचे चिनी समकक्ष शी जिनपिंग यांनी इराण-इस्रायल युद्धाबाबत एकमेकांना संवेदनशील माहिती देण्यास सहमती दर्शविली आहे.
पुतिन आणि जिनपिंग यांच्यात काय चर्चा झाली? ISRAEL-IRAN WAR।
क्रेमलिनचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह म्हणाले, “एक तास चाललेल्या फोन संभाषणादरम्यान राष्ट्रपती पुतिन आणि शी जिनपिंग यांनी त्यांच्या संबंधित एजन्सींना इराणबद्दल माहिती सामायिक करण्याचे आदेश देण्यास सहमती दर्शविली.” गेल्या आठवड्यात, इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ सुरू केले, ज्याने इराणच्या अणु, क्षेपणास्त्र आणि लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. नंतर, इराणनेही इस्रायलला प्रत्युत्तर दिले.
बुधवारी, रशिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांनी इस्रायल-इराण युद्ध त्वरित संपवण्याचे आणि तेहरानच्या अणु समस्येचे निराकरण करण्यासाठी राजकीय आणि राजनैतिक प्रयत्न तीव्र करण्याचे आवाहन केले. क्रेमलिनच्या म्हणण्यानुसार, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांचे युएई समकक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणादरम्यान या विषयावर चर्चा केली.





