इस्त्रायलने आतापर्यंत हमासच्या 1850 दहशतवाद्यांना पकडले

तेल अविव – हमासविरुद्धचे युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलच्या फौजांनी एकूण 1,850 दहशतवादी पकडले असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायल आणि गाझा पट्ट्यादरम्यानच्या ज्युडिया आणि समारिया या भागांमधून या दहशतवाद्यांना पकडण्यात आले. त्यापैकी 1,100 दहशतवादी हमासशी संबंधित असल्याचे इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
शनिवार आणि रविवार दरम्यानच्या रात्री केलेल्या कारवाईमध्ये आणखीन 16 दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. यामध्ये तारेक अब्दुल्लाह अहमद सालेम या एका वरिष्ठ म्होरक्याचाही समावेश आहे. याला शावारवा गावातून पकडण्यात आले आहे.
वादी फारा येथील कारवाईमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीनंतर इस्रायलच्या इझियॉन ब्रिगेडने या म्होरक्याला अटक केली, असे “आयडीएफ’ने म्हटले आहे.
याशिवाय, रात्री दहशतवाद्यांनी सामरियामध्ये अनेक इस्रायली वाहनांवर गोळीबार केला. या गोळीबारामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आणि रस्त्यावर पेरलेल्या भुसुरुंगांमुळे इतर अनेक वाहनांचे नुकसान झाले. इस्रायलच्या या मोहिमांमध्ये इस्रायली सैन्य दलातील कोणीही सैनिक जखमी झाला नाही.





