Israel Hamas War: इस्रायल-हमास युद्धात होणार अमेरिकाची ‘एन्ट्री’? 2000 US सैनिक अलर्ट मोडवर

Israel Hamas War – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचले आहे. अमेरिकन सरकारच्या आदेशानुसार सुमारे 2000 अमेरिकन सैनिक आणि युनिट्सना अलर्ट करण्यात आले आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्या आदेशानुसार अमेरिकन सैनिकांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
हमाससोबतच्या युद्धात अमेरिका पूर्णपणे इस्रायलच्या पाठीशी उभी आहे. अमेरिकेने अनेक प्रसंगी सांगितले आहे की, जोपर्यंत अमेरिका अस्तित्वात आहे तोपर्यंत ते इस्रायलची साथ सोडणार नाही. या आश्वासनादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन बुधवारी इस्रायलला पोहोचत आहेत.
हमासच्या हल्ल्याविरोधात एकता दाखवण्यासाठी आपण इस्रायलला जात असल्याचे बिडेन यांचे म्हणणे आहे. अमेरिका आणि इस्रायलची मैत्री कोणापासून लपलेली नाही. अमेरिका इस्रायलला शस्त्रे आणि इतर आवश्यक वस्तू पुरवत आहे. अशा स्थितीत इस्रायलमध्ये पोहोचण्यापूर्वीच जोपर्यंत अमेरिका आहे तोपर्यंत ते इस्रायलच्या पाठीशी उभे राहतील, असे बिडेन सरकारने म्हटले आहे.
अमेरिका इस्रायलच्या पाठीशी उभी –
याआधी बिडेन यांना विचारण्यात आले होते की, यावेळी ते गाझावरील इस्रायलच्या ताब्याला पाठिंबा देतील का? यावर ते म्हणाले, मला वाटतं की ही खूप मोठी चूक असेल. माझ्या मते गाझामध्ये जे घडले ते हमासमुळे झाले आणि हमासचे अतिरेकी हे सर्व पॅलेस्टिनी लोकांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. गाझा पुन्हा ताब्यात घेणे इस्रायलची चूक असेल, असे मला वाटते. पण आम्ही आत जात आहोत. अतिरेक्यांना हुसकावून लावले जात आहे. हिजबुल्ला उत्तरेत आहे पण हमास दक्षिणेत आहे. बिडेन यांना विचारण्यात आले की, तुम्हाला वाटते का की हमासचा संपूर्ण नाश झाला पाहिजे? यावर ते म्हणाले, होय, माझा पाठिंबा आहे.
व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनानुसार, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले होते की, इस्रायलव्यतिरिक्त राष्ट्राध्यक्ष बिडेन जॉर्डनलाही भेट देणार आहेत. यादरम्यान ते जॉर्डनचे राजे अब्दुल्ला, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी आणि पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांची भेट घेणार आहेत.
युद्ध कसे सुरू झाले?
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा मंगळवार हा 11 वा दिवस आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने गाझा पट्टीतून रॉकेट हल्ल्यांची मालिका सुरू केली. हे हल्ले इस्रायलवर करण्यात आले. हमासने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असून याला इस्रायलविरोधातील लष्करी कारवाई म्हटले आहे. हमासने सुमारे 20 मिनिटांत गाझा पट्टीतून 5,000 रॉकेट डागले. एवढेच नाही तर इस्रायलमध्ये घुसखोरी करून काही लष्करी वाहने ताब्यात घेण्यात आली. या युद्धात दोन्ही बाजूंचे शेकडो लोक मरण पावले आहेत.
इस्रायलकडून गाझा पट्टीवर सातत्याने बॉम्बफेक करण्यात येत आहे. त्याचवेळी पॅलेस्टाईनमधील हमासचे लढवय्येही गप्प बसलेले नाहीत. ते अजूनही तीन आघाड्यांवरून इस्रायलवर हल्ले करत आहेत. लेबनॉन, समुद्राला लागून असलेला भाग आणि इजिप्तला लागून असलेल्या दक्षिण गाझा येथून रॉकेट आणि क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. गुरुवारी मध्य इस्रायलच्या वेस्ट बॅंकेच्या दिशेनेही रॉकेट डागण्यात आले.
7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या युद्धानंतर गाझामध्ये सात दिवसांत 22 हजारांहून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. इस्रायलने 10 रुग्णालये आणि 48 शाळांवर बॉम्बफेक केली आहे. गाझामध्ये आतापर्यंत मृतांचा आकडा 1400 च्या वर गेला आहे. यामध्ये 447 हून अधिक मुलांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार गाझामधील तीन लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्यास भाग पाडले गेले आहे.





