इस्रायलच्या सैनिकांनी शनिवारी केलेल्या गोळीबारात गाझामधील किमान ३३ पॅलेस्टिनी ठार झाले. तंबूंमध्ये वास्तव्य करणारे आणि मदत केंद्रांवर अन्नांसाठी विसंबून असलेले पॅलेस्टिनीही या हल्ल्यात ठार झाले. दक्षिण गाझामध्ये तंबूंमध्ये अडकलेल्या महिला आणि लहान मुलांसह १७ जण या गोळीबारात मारले गेले. तर उत्तर गाझामध्ये, इस्रायलला लागून असलेल्या झिकिम क्रॉसिंगजवळ इस्रायली गोळीबारात किमान पाच मदत कार्यकर्ते ठार झाले. तर इतरत्र झालेल्या हल्ल्यांमध्ये अकरा लोक मारले गेले, असे रुग्णालये आणि पॅलेस्टिनी रेड क्रेसेंटने म्हटले आहे. मात्र खान युनूसमध्ये गोळीबार झाल्याचे आपल्याला माहिती नसल्याचे इस्रायली सैनिकांनी म्हटले आहे. इतर ठिकाणच्या गोळीबाराची माहिती घेतली जात असल्याचेही सांगण्यात आले. गाझा सिटीमध्ये दुष्काळ जाहीर झाला असताना सैन्याचे हल्लेही सुरू आहेत. इस्रायलने गाझामधील आपल्या हल्ल्यांची व्याप्ती वाढवली असून या नव्या मोहिमेंतर्गत गाझा सिटी नष्ट केले जाईल, असा इशारा इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिला आहे. भीषण दुष्काळ पडलेला असताना ही नवीन मोहिम काही दिवसातच सुरू होणार आहे. गाझामध्ये मदत साहित्याच्या ट्रकवर इस्रायलने गेल्या अनेक महिन्यांपासून मोठे निर्बंध घातले असल्यामुळे अन्न आणि औषधांचा पुरवठा अगदी कमी प्रमाणात होतो आहे. त्यामुळे उपासमार होत असलेल्या गाझामधील पॅलेस्टिनींच्या संकटात मोठी वाढ झाली आहे. गाझामध्ये दुष्काळ पडल्याचा दावा इस्रायलने सपशेल फेटाळून लावला आहे. युद्धबंदीसाठीची चर्चा थांबली असून इस्रायल आता नक्की काय पावले उचलणार, याकडे मध्यस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.