कैरो – इस्रायल आणि हमासमधील शांतता चर्चा आता अंतिम टप्प्यात पोचली आहे. मात्र युद्धबंदी अद्याप मान्य केली जायची बाकी आहे आणि हमासच्या तावडीतील डझनभर ओलिसांची सुटका होणेही बाकी आहे, असे कतारने म्हटले आहे. कतारचे परराष्ट्र मंत्री मजेद अल-अन्सारी यांनी मंगळवारी माध्यमांबरोबरच्या साप्ताहिक वार्तालापामध्ये ही माहीती दिली. दोन्ही बाजूंमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटी सकारात्मक आणि उत्पादक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र या चर्चेमधील संवेदनक्षमता लक्षात घेऊन या चर्चेचो कोणताही तपशील त्यांनी उघड केला नाही. इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या अप्रत्यक्ष चर्चेमध्ये अमेररिका, इजिप्त आणि कतारकडून मध्यस्थी केली जाते आहे. कतारची राजधानी दोहा येथेच ही शांतता चर्चा होते आहे. चर्चेच्या प्रक्रियेचा भाग म्हणून कतारने इस्रायल आणि हमास दोन्ही बाजूंना एक अंतिम तोडग्याचा मसुदा सादर केला आहे. हा मसुदा तयार करण्यासाठी कतारचे दोन अधिकारी सक्रिय आहेत. या चर्चेमध्ये प्रगती झाली असून अद्याप अंतिम निर्णय व्हायचा असल्याचे इस्रायलनेही म्हटले आहे. या मसुद्याच्या वैधतेला इजिप्त आणि हमासनेही मान्यता दिली आहे. आता इस्रायलच्या मंत्रिमंडळासमोर हा मसुदा मंजूरीसाठी मांडण्यात येणार आहे. इस्रायलने गाझा पट्ट्यातून सैन्य माघारी घेणे आणि हमासने उर्वरित ओलिसांची बिनशर्त सुटका करण्याच्या मुद्याचा या युद्धबंदीच्या मसुद्यात समावेश करण्यात आल्याचे समजते आहे. हमासच्या तावडीत किमान १०० इस्रायली आहेत. त्यापैकी अनेक जण ठार झाले असावेत, असे इस्रायल मानत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेण्यापुर्वी शांतता चर्चा पुर्ण व्हावी, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. दरम्यान संपूर्ण गाझामध्ये इस्रायलने मंगळवारी रात्रभर केलेल्या माऱ्यात किमान १८ जण ठार झाले. तर दुसरीकडे येमेनमधील हौथी बंडखोरांनीही इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली. मात्र या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. युद्धबंदीच्या कराराच्या मसुद्याची आखणी ज्यो बायडेन यांनी केलेल्या आराखड्याप्रमाणे केली गेली आहे. कराराच्या या आराखड्याला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनेही मंजूरी दिली आहे. त्यानुसार पहिल्या ६ आठवड्यात महिला, मुले आणि जखमी, ज्येष्ठ नागरिक असलेल्या ३३ ओलिसांची सुटका केली जाईल. त्यांच्या बदल्यात इस्रायलच्या तुरुंगातल्या शेकडो पॅलेस्टिनींची सुटका केली जाईल. या ३३ ओलिसांमधील ५ इस्रायली पोलीस महिलांच्या बदल्यात ५० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका होईल. यात दोषी ठरवलेल्या ३० दहशतवाद्यांचीही सुटका केली जाईल. पहिल्या ४२ दिवसात दाट लोकवस्तीतून इस्रायली सैन्य माघार घेईल. तर उत्तर गाझातल्या घरी परत जाण्यास पॅलेस्टिनींनाही परवानगी दिली जाईल. मानवतावादी मदत म्हणून दररोज ६०० टक्के मदत साहित्य जाऊ दिले जाईल. दुसऱ्या टप्प्यात युद्धबंदी करार होईपर्यंत शस्त्रसंधी पाळली जाण्याची लेखी हमी द्यावी लागेल. याशिवाय उर्वरित ओलिसांचीही सुटका हमासला करावी लागेल. तर गाजातून सर्व सैन्याची माघार इस्रायलला करावी लागेल. तिसऱ्या टप्प्यात मृत ओलिसांचे मृतदेह हमासने परत केले पाहिजेत. त्याबदल्यात आंतरराष्ट्रीय समुदायाच्या देखरेखीखाली गाझाची ३ ते ५ वर्षात फेरउभारणी केली जावी, असे या युद्धबंदी कराराच्या मसुद्यात म्हटले आहे.