Israel : इस्त्रायलने जारी केले याह्या सिनवारचे फुटेज

Israel – इस्त्रालयाच्या लष्कराने रविवारी त्यांच्या लष्करी कारवाईत मारले गेलेले हमासचे माजी प्रमुख याह्या सिनवारचे फुटेज जारी केले आहेत. इस्रायली सैन्याने 16 ऑक्टोबर रोजी रफाहमध्ये याह्या सिनवारला ठार केले आहे.
इस्रायलचा दावा आहे की सिनवार हा इस्रायलवर हमासच्या दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. लष्कराच्या सोशल मीडियावरील अधिकृत अकाउंटवरून फुटेज जारी करण्यात आले आहेत. फुटेजमध्ये याह्या सिनवार आपल्या कुटुंबासह बोगद्यातून बाहेर पडत असल्याचे दिसून येते.
हे फुटेज 7 ऑक्टोबर 2023 चे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच रात्री हमासने इस्रायलवर हल्ला केला. आयडीएफचा दावा आहे की सिनवार 7 ऑक्टोबरच्या रात्री या बोगद्यात लपला होता. फुटेजमध्ये सिनवार याची पत्नी आणि मुले दिसत आहेत.
सिनवार बोगद्यात उशा, गाद्या आणि दूरचित्रवाणी संच घेऊन जाताना दिसतो. चित्रात सिनवार याच्या पत्नीच्या हातात काळी पर्स दिसत आहे. या पर्सची किंमत ३२ हजार डॉलर अर्थात जवळपास २७ लाख रूपयांची आहे.
फुटेजचे स्क्रीनशॉट शेअर करत इस्रायलने लिहिले की, जेव्हा गाझातील लोक हमासच्या राजवटीत त्रस्त होते, तेव्हा सिनवार आणि त्याचे कुटुंब निर्लज्जपणे ऐषोआरामात जगत होते आणि इतरांना मरण्यासाठी पाठवत होते.





