नवी दिल्ली : भारत आणि इस्रायल दरम्यान मुक्त व्यापार करार करण्याची बोलणी चालू आहे. या बोलणीचा आढावा घेण्यासाठी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासह 60 जणांचे शिष्टमंडळ तीन दिवसाच्या इस्रायल भेटीवर जाणार आहे. फक्त मुक्त व्यापार करारच नाही तर इस्रायल आणि भारत दरम्यान गुंतवणुकीची आणि तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण वाढावी यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत. दोन्ही देशांदरम्यान या अगोदर चर्चेच्या आठ फेर्या झाल्या आहेत. 2024-25 मध्ये भारताची इस्रायलला निर्यात वार्षिक पातळीवर 52 टक्क्यांनी कमी होऊन 2.14 अब्ज डॉलर झाली आहे. तर आयात 26 टक्क्यांनी कमी होऊन 1.48 अब्ज डॉलर झाली आहे. ही भेट भारत आणि इस्रायलमधील वाढत्या धोरणात्मक आणि आर्थिक संबंधांना अधोरेखित करत व्यापार, तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि गुंतवणूक या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या दोन्ही देशांच्या सामायिक वचनबद्धतेला प्रतिबिंबित करणारी आहे. भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय), भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (फिक्की), असोचेम आणि स्टार्ट-अप इंडिया यांतील व्यावसायिक शिष्टमंडळ गोयल यांच्यासोबत आहे. या भेटीदरम्यान,गोयल इस्रायली वरिष्ठ नेत्यांसोबत उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठका घेतील. गोयल यांचे इस्रायली समकक्ष, अर्थ आणि उद्योग मंत्री नीर बरकत यांच्या व्यतिरिक्त, यावेळी गोयल काही इतर मंत्र्यांनाही भेटण्याची शक्यता आहे. व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करणे, कृषी, पाणी, संरक्षण, उदयोन्मुख तंत्रज्ञान, जीवशास्त्र, पायाभूत सुविधा, प्रगत उत्पादन यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणे आणि स्टार्ट-अपसह दोन्ही देशांच्या व्यवसायांमध्ये वाढीव सहकार्याच्या संधी ओळखणे यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. प्रस्तावित भारत-इस्रायल मुक्त व्यापार कराराच्या प्रगतीचा देखील आढावा यावेळी घेतला जाण्याची अपेक्षा आहे.